Join us

सिनेट सदस्यांचाही ‘आम्ही १६२’चा नारा, राज्यपालांच्या अनुपस्थितीमुळे युवासेनेच्या सिनेट सदस्यांची प्रवेशबंदी टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 2:45 AM

मंगळवारी युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ संपल्यानंतर ‘आम्ही १६२’चा जोरदार नारा दिला.

मुंबई : मंगळवारी युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ संपल्यानंतर ‘आम्ही १६२’चा जोरदार नारा दिला. हाच नारा ते राज्यपालांच्या उपस्थितीतही देणार होते. मात्र, त्याच वेळी युवासेनेकडून गोंधळ घालण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर त्यांना सभागृहात प्रवेशबंदीचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले. परंतु सत्तास्थापनेच्या तिढ्यामुळे राज्यपाल व मुंबई विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी दीक्षान्त समारंभाला येण्याचे टाळल्याने युवासेनेच्या सिनेट सदस्यांवरील प्रवेशबंदी टळली.मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ मंगळवारी फोर्ट कॅम्पसमधील दीक्षान्त सभागृहात पार पडला. या समारंभाचे अध्यक्षस्थान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी भूषविणार होते. मात्र राज्यातील सत्तास्थापनेचा पेच वाढल्याने राज्यपालांनी समारंभाला येण्याचे टाळले.राज्यपाल समारंभाला उपस्थित राहणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी युवासेनेच्या सिनेट सदस्यांना विद्यापीठ परिसरात प्रवेशबंदी करण्याच्या सूचना विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सकाळपासूनच मुंबई पोलीस आणि विद्यापीठाच्या सुरक्षारक्षक अधिकाऱ्यांनी तयारीही केली होती. परंतु राजभवनातून राज्यपाल समारंभाला हजर राहणार नसल्याचे कळविण्यात आल्यानंतर पोलीस आणि विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी युवासेनेच्या सिनेट सदस्यांना सभागृहात प्रवेश देण्यात आला.संविधान दिनानिमित्त युवा सेनेच्या सदस्यांनी राज्यपालांना भेट म्हणून संविधानाची प्रत आणली होती. यासोबत ‘आम्ही १६२’ पत्रकही ते त्यांना देणार होते.परंतु राज्यपाल उपस्थित न राहिल्याने त्यांनी समारंभ संपल्यानंतर प्रदीप सावंत, डॉ. सुप्रिया करंडे, राजन कोळंबेकर, महादेव जगताप, प्रवीण पाटकर व शीतल देवरुखकर शेठ या सिनेट सदस्यांनी दीक्षान्त सभागृहाबाहेर ‘आम्ही १६२’चे फलक झळकावत निषेध केला.राज्यपालांना संविधानाची आठवण राहण्यासाठी आम्ही त्यांना संविधानाची प्रत देणार होतो, असे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी या वेळी सांगितले.

टॅग्स :मुंबई विद्यापीठमुंबई