Join us  

सेनेचा भाजपाला दुसरा हादरा, भूखंड देण्याचा प्रस्ताव फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 2:48 AM

आरे कॉलनीत मेट्रो कारशेडचा प्रस्ताव रखडवल्यानंतर भाजपाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शिवसेनेने पुन्हा सुरुंग लावला आहे. मेट्रो ३ प्रकल्पाच्या इलेक्ट्रिक सब

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आरे कॉलनीत मेट्रो कारशेडचा प्रस्ताव रखडवल्यानंतर भाजपाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शिवसेनेने पुन्हा सुरुंग लावला आहे. मेट्रो ३ प्रकल्पाच्या इलेक्ट्रिक सब स्टेशनसाठी अंधेरी येथे मलनिस्सारण प्रकिया केंद्राकरिता राखीव असलेला भूखंड देण्याचा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळून लावला आहे. मुंंबईकरांच्या सोयी-सुविधांसाठी आरक्षित असलेले भूखंड कुठल्याही परिस्थितीत मेट्रो प्रकल्पाला देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो प्रकल्प तीनला गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीत कारशेडसाठी जागा देण्याचा प्रस्ताव सुधार समितीने यापूर्वी फेटाळला आहे. येथील झाडांची कत्तल करून मेट्रोसाठी जागा खुली करण्यास शिवसेनेचा नकार आहे. त्यानंतर आता मेट्रोच्या दुसऱ्या प्रकल्पाला शिवसेनेने दुसरा झटका दिला आहे. यामुळे भाजपाच्या गोटात तीव्र नाराजी पसरली आहे.दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व अशा १८ किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाच्या मार्गासाठी इलेक्ट्रिक सब स्टेशन उभारण्यात येणार आहे. यासाठी अंधेरी येथील चार हजार चौरस मीटरची जागा द्यावी, अशी मागणी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने पालिका प्रशासनाकडे केली आहे. याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीत मांडण्यात आला होता.शिवसेनेचा युक्तिवाद...न्यायालयाने शांतता क्षेत्राचे निकष घालून दिले असताना मेट्रो प्रकल्पाकडून हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत.पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत सुरू असणाऱ्या मेट्रोच्या ध्वनिप्रदूषणामुळे नागरिक, रुग्णांना मनस्ताप होत आहे.मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली.मलनिस्सारण प्रकिया केंद्रासाठी आरक्षित असलेली जागा मेट्रोला दिल्यास भविष्यात नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.शिवसेनेची भूमिका दुटप्पी...मेट्रो रेल्वे प्रकल्पाला शिवसेनेने नकारघंटा वाजवली असल्याने भाजपाच्या गोटात संताप पसरला आहे. अक्षयपात्र या खासगी संस्थेला भूखंड दिला जातो, मात्र मुंबईच्या वाहतुकीचे चित्र बदलणाऱ्या मेट्रो प्रकल्पाला जागा देण्यास विरोध होतो. जनतेच्या हिताची नाही, तर ही दुटप्पी भूमिका आहे, असा आरोप भाजपाचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी केला आहे.मेट्रो प्रकल्पासाठी भाजपाची धावपळ...मेट्रोमुळे वाहतूक समस्या मिटणार आहे. लोकांचा वेळ वाचणार असून इंधनाची बचत होणार आहे. मुंबईकरांना प्रवासासाठी नवा पर्याय उपलब्ध होणार असल्याने मेट्रोला लागतील तितक्या जागा द्या, असे आवाहन भाजपाचे नगरसेवक प्रकाश गंगाधारे, ज्योती अळवणी, जगदीश ओझा यांनी केले.