मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत कर्जमाफीची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत मागावी, असे आदेश पक्षाच्या मंत्र्यांना दिलेले असताना सेनेच्या एकाही मंत्र्यांनी मंगळवारच्या बैठकीत यावर तोंड उघडले नसल्याची माहिती आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. अहमदनगर येथील सभेत बोलताना त्यांनी शेतकरी कर्जमाफीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. तसेच कर्जमाफीची आकडेवारी सरकारला विचारा, असे त्यांनी स्वपक्षाच्या मंत्र्यांना बजावले होते. ठाकरे यांच्या आरोपानंतर सहकार विभागाने कर्जमाफीची आकडेवारीच सादर करत, त्यांच्या आरोपातील हवा काढून घेतली होती. त्यामुळे मंगळवारच्या बैठकीत सेनेचे मंत्री काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, सेनेच्या एकाही मंत्र्याने कर्जमाफीवरुन ब्र’ही बैठकीत काढला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.उद्धव ठाकरे भाजपावर रोज जोरदार टीकास्त्र सोडत आहेत. याबाबत भाजपाचे एक ज्येष्ठ मंत्री म्हणाले, शिवसेनेला स्वत:ची वेगळी प्रतिमा तयार करायची असल्याने ते सरकारविरोधात बोलत आहेत. पण सगळ्या निर्णयप्रक्रियेत तेही सहभागी आहेत याचा त्यांना विसर पडला आहे.
कर्जमाफीतील घोळाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मौन
By अतुल कुलकर्णी | Published: October 24, 2018 5:13 AM