Join us

फोटो पाठवा, खड्डा बुजवा!

By admin | Published: July 24, 2015 1:48 AM

राज्यातील सर्व रस्ते येत्या चार वर्षांत खड्डेमुक्त करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.

मुंबई : राज्यातील सर्व रस्ते येत्या चार वर्षांत खड्डेमुक्त करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. रस्त्यावरील खड्ड्याचा फोटो पाठवा; तो तत्काळ बुजविला जाईल, अशी योजना विभागातर्फे लवकरच सुरू केली जाईल, असे ते म्हणाले. राज्यातील रस्त्यांच्या समस्येवर सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना पाटील म्हणाले की, खड्ड्याचा फोटो मोबाइल अ‍ॅपवर अपलोड करताच विभागातर्फे त्याला तत्काळ प्रतिसाद देणारे सॉफ्टवेअर तयार केले जाईल. तक्रारीनंतर काही वेळातच खड्डा बुजलेला असेल. रस्त्यांवर खड्डे पडल्यास संबंधित कनिष्ठ अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना जबाबदार धरले जाईल.आता बांधकाम विभाग २ हजार मजुरांची भरती करणार आहे. राज्यात ४०० कनिष्ठ अभियंत्यांची गरज आहे. त्यांची भरती करण्याचे अधिकार एमपीएससीऐवजी विभागाला देण्याची मागणी केली असून, ती लवकरच मान्य होईल, असे पाटील म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)