Join us

रेणुका शहाणे यांना काँग्रेसतर्फे विधान परिषेदेवर पाठवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 4:25 PM

Legislative Council : रेणुका शहाणे यांच्या नावाची मागणी करून चर्चेचा धुरळा.

मनोहर कुंभेजकर

मुंबई : रेणुका शहाणे  या मराठी तसेच हिंदी भाषेतल्या चित्रपटांत व दूरचित्रवाणी कार्यक्रमांतून अभिनय करणार्‍या मराठी अभिनेत्री आहेत.दूरदर्शनवरील सुरभि (१९९३-२००१) या मालिकेतील सूत्रसंचालक म्हणून त्या पहिल्यांदा प्रकाश झोतात आल्या होत्या.तर "हम आपके है कौन" या हिंदी चित्रपटामुळे त्या घराघरात पोहचल्या होत्या.

 राज्यपाल नामनिर्देशीत 12 जागांचा तिढा महाराष्ट्रात सुटला नसतांना मुंबई काँग्रेस चे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी रेणुका शहाणे यांच्या नावाची मागणी करून चर्चेचा  धुरळा उडवून टाकला आहे. राज्यपाल यावेळी कला,क्रीडा, साहित्य यांच्या  व्यतिरिक्त अन्य नावांना केराची टोपली दाखविणार असल्याची जोरदार चर्चा असल्याने यादीत चर्चेत असलेल्या राजकीय नेत्यांचे धाबे दणाणलेले आहे.

कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते राहुल गांधी, महाराष्ट्राचे काँग्रेसचे निरीक्षक एच. के. पाटील, महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना ट्विट करून सदर मागणी करण्यात आलेली आहे. धनंजय जुन्नरकर यांच्या मते काँग्रेसने नेहमीच चांगल्या अभिनेता, अभिनेत्री, खेळाडू  यांना राज्यसभा , विधानसभा येथे पाठवून त्यांच्या कार्याचा बहुमान केलेला आहे. काँग्रेसकडे विधान परिषदेच्या 4 जागा आहेत .  आजच्या परिस्थितीत राज्यपाल हे कला,क्रीडा, साहित्य , विज्ञान या संदर्भातच विचार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. रेणुका शहाणे यांची ट्विट आपण पहा, जेथे मोठमोठे नेते प्रतिक्रिया द्यायला घाबरतात तेथे त्यांनी बिनधास्त प्रतिक्रिया दिलेली आहे.   खरी तुकडे तुकडे गॅंग तुमची आयटी सेल आहे असे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या ट्विट मध्ये त्यांनी म्हंटले होते याची आठवण त्यांनी दिली.

प्रत्येक चालू घडामोडींवर त्या अभ्यासपूर्ण ट्विट करतात. त्यामुळे त्यांच्या सारख्या अभ्यासू ,निर्भीड आणि विद्वान व्यक्तीस काँग्रेसने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत नाव द्यावे अशी मागणी आपण काँग्रेस पक्ष श्रेष्टींकडे केल्याचे धनंजय जुन्नरकर यांनी लोकमतला सांगितले. कंगना रणावत प्रकरणात त्यांनी मुंबई पोलीस व महाराष्ट्राची उत्तम बाजू मांडली होती. रेणुका शहाणे यांना विधान परिषद मिळाल्यास त्या अजून जोमाने काम करतील व गरजूंना न्याय देतील असे धनंजय जुन्नरकर शेवटी म्हणाले.

टॅग्स :राजकारणमुंबईमहाराष्ट्र