लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: ‘गरिबांना कोविड लस देण्यासाठी मी दीड कोटी पाठविते,’ असे आमिष बेतन वेगन नावाच्या महिलेने दाखवत वृद्धाला जवळपास २० लाखांचा चुना लावला. या प्रकरणी पवई पोलिसांनी तिघांना मंगळवारी नोएडामधून जेरबंद केले.
सदर महिलेने फेसबुकवर बनावट खाते तयार करत, सुब्रमण्यम रामण (८४) यांच्याशी मैत्री केली. त्यानंतर, ती लंडनमधून बोलत असून, रामण यांच्या खात्यावर ब्रिटिश पाउंड म्हणजे भारतीय चलनात १ कोटी ४० लाख रुपये पाठविते, असे सांगितले. मात्र, त्यासाठी कस्टम क्लीअरन्स आणि इन्कम टॅक्सच्या नावाखाली २० लाख ४७ हजार ८१० रुपये भरायला लावले. पवई पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी चौकशी सुरू केली आणि ज्यात दरम्यान रामण यांनी ३ लाख ४४ हजार रुपये ज्या खात्यात जमा केलेत, ते नोएडामध्ये राहुल तिवारी नामक व्यक्तीचे असल्याचे समजले.
त्यानुसार, पाटील यांच्या पथकाने नोएडातून तिवारीला अटक केली. त्याच्या चौकशीत आसिफ हुसेन नामक व्यक्तीच्या सांगण्यावरून सात बँकांमध्ये खाते उघडले असून, त्या बदल्यात त्याला ४० हजार रुपये देण्यात आल्याचे सांगितले. आसिफ वसीम खान याला सर्व बँकाचे एटीएम, पासबुक किट दिल्याचेही उघड झाले. त्यानुसार, या तिघांचाही गाशा गुंडाळण्यात आला. त्यामुळे १६ बँकांचे एटीएम कार्ड, पासबुक, चेकबुक, आधार कार्ड, चार मोबाइल अशा बऱ्याच गोष्टी हस्तगत करण्यात आल्या. परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.