मुंबई - भगवे आमचे रक्त खवळले तप्त हिंदवी बाणा, जात-गोत्र-धर्म आमचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना... हे शिवसेनेचे प्रचार गीत चांगलंच गाजलं. शिवसैनिकांनी अक्षरश: हे गाणं डोक्यावर घेतलं. त्यामुळे, शिवसेनेच्या मेळाव्यात सभेत, कार्यक्रमांमध्येही हे गाणं वाजायला लागलं. नुकतेच शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर शिंदे गटानेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यावरील गाणं लाँच केलं. अनाथांचा नाथ... लोकनाथ असे म्हणत शिंदे गटाचेही गाणे लाँच झाले. आता, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही एक गाणं बनविण्यात आलं आहे. अन्यायाविरुद्ध लढणारा शिवसेनेचा युवराज असे शब्द या गाण्यात आहेत.
शिवसेनेतील बंडाळीनंतर आदित्य ठाकरेंनी मोर्चा हाती घेतल्याचं दिसून आलं. विविध संवाद यात्रांमधून त्यांनी बंडखोर आमदारांवर जबरी टीका केली. बंडखोर आमदारांना गद्दार उपमा देत त्यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं. तसेच, शिवसेनेची भूमिका मांडताना भाजपसह सत्ताधाऱ्यांवरही जोरदार निशाणा साधला आहे. त्यामुळे, आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाचं गुण गाणारं हे गाणं लाँच करण्यात आलं आहे. 'शिवसेनेचा युवराज' असे शीर्षक असलेल्या या गीताचे आज लॉन्चिंग करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते अंधेरी पश्चिमेकडील एका विशेष कार्यक्रमात हे गाणे लाँच झाले. माजी केंद्रीय मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेल्या शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभेचे संघटक संजय कदम यांनी हे गीत तयार केले आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या एक दिवस अगोदर हे गाणे लॉन्च करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आता हे गाणे शिवसैनिकांना प्रेरणादायी ठरू शकते. आदित्य ठाकरे यांनी गेल्या ४ महिन्यांत ज्या पद्धतीने आक्रमकपणा आणि अभ्यासू पद्धतीने प्रश्नांची माळ उडवली आहे, त्याला अनुसरूनच हे गाणं लाँच करण्यात आलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आदित्य ठाकरेंचा चेहरा समोर करत हे प्रचार गीत शिवसैनिकांमध्ये नवा जोश, नवा उत्साह भरु शकते.