मुंबई महापालिकेत आता ज्येष्ठ वकिलांचे पॅनल; न्यायालयीन कार्यवाही गतिमान होण्यासाठी निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 06:12 AM2017-11-01T06:12:30+5:302017-11-01T06:12:38+5:30
महापालिकेशी संबंधित सुमारे ९० हजार दावे वा खटल्यांविषयीची न्यायालयीन प्रक्रिया विविध न्यायालयांमध्ये सुरू आहे. यापैकी अनेक खटले हे वरिष्ठ स्तरावरील न्यायालयांमध्ये; अर्थात सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांमध्ये सुरू आहेत.
मुंबई : महापालिकेशी संबंधित सुमारे ९० हजार दावे वा खटल्यांविषयीची न्यायालयीन प्रक्रिया विविध न्यायालयांमध्ये सुरू आहे. यापैकी अनेक खटले हे वरिष्ठ स्तरावरील न्यायालयांमध्ये; अर्थात सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांमध्ये सुरू आहेत. या खटल्यांबाबत महापालिकेची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी महापालिकेला ज्येष्ठ वकिलांची आवश्यकता असते. खटल्यांच्या वर्गवारीनुसार ज्येष्ठ वकिलांचे सहकार्य त्वरित मिळावे, या दृष्टीने कनिष्ठ वकिलांच्या धर्तीवर महापालिकेत १०० ज्येष्ठ वकिलांचेही पॅनल तयार करण्याचे आदेश आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत. त्यानंतर ज्येष्ठ वकिलांचे पॅनल तयार करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
विधि खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ वकिलांचे वर्गीकृत पॅनल महापालिकेत यापूर्वी नव्हते. ही बाब लक्षात घेत कनिष्ठ वकिलांच्या पॅनलच्या धर्तीवर महापालिकेत वरिष्ठ वकिलांचेही पॅनल तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्यानुसार आता वरिष्ठ वकिलांचे पॅनल तयार करण्याच्या दृष्टीने अर्ज मागविण्यात आले आहेत. ज्येष्ठ वकिलांचे अनुक्रमे ए, बी व सी असे तीन पॅनल तयार करण्याचे प्रस्तावित आहे. ए व सी पॅनलमध्ये प्रत्येकी ४० वकिलांचा; तर बी पॅनलमध्ये २० वकिलांचा समावेश असणार आहे. तिन्ही पॅनलमध्ये एकूण १०० ज्येष्ठ वकिलांचा समावेश करण्यात येणार आहे.
अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत
- वरिष्ठ वकील म्हणून नोंदणी झालेल्या ४० ज्येष्ठ वकिलांचा समावेश ए पॅनलमध्ये असणार आहे.
- सी पॅनलमध्ये सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात अशिलाची बाजू मांडण्याचा किमान २५ वर्षांचा अनुभव असणाºया ४० ज्येष्ठ वकिलांचा समावेश करण्यात येणार आहे.
- बी पॅनलमध्ये सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश, अॅटर्नी जनरल आॅफ इंडिया, सॉलिसिटर जनरल आॅफ इंडिया, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल, अॅडव्होकेट जनरल, अतिरिक्त अॅडव्होकेट जनरल, माजी अॅटर्नी जनरल आॅफ इंडिया, माजी सॉलिसिटर जनरल, माजी अॅडव्होकेट जनरलनुसार वरिष्ठ स्तरावर कार्य करणाºया २०
वकिलांचा समावेश असणार आहे.
- पॅनलमध्ये समाविष्ट होऊ इच्छिणाºया ज्येष्ठ वकिलांकडून महापालिकेने अर्ज मागविले आहेत. यासाठी अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे.