Ujjwal Nikam News: राजकारण माझा प्रांत नाही. मात्र तुमच्या माध्यमातून स्पष्ट करू इच्छितो की, देशाचे संविधान, कायदा आणि सुरक्षितता यालाच माझे प्रथन प्राधान्य असेल. या गोष्टींसाठी संसदेत कोणते प्रश्न मांडले जाऊ शकतात, यावर भर असणार आहे, असे सांगत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपाकडून उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
वकिलीच्या कारकिर्दीत गंभीर प्रकारच्या गुन्ह्यातील खटले लढवले आहेत. त्यातील अनेक खटल्यांचा संबंध थेट राष्ट्रहिताशी निगडीत होता. अनेक गोष्टी मी पाहिल्या आहेत आणि अनुभवल्या आहेत. त्यामुळे कायदा सर्वश्रेष्ठ असायला हवा, मजबूत असायला हवा. मात्र, असे असताना सर्वसामान्य जनतेला त्याचा भार किंवा त्रास होता कामा नये, असे स्पष्ट मत उज्ज्वल निकम यांनी मांडले.
पंतप्रधान यांच्यामुळे जगभरात भारताचे नाव आदराने घेतले जाते
आतापर्यंत अनेक प्रकारच्या गुन्हेगारांच्या विरोधातील खटले लढवले आहेत. सामूहिक बलात्कारातील गुन्ह्यांपासून ते दहशतवादी हल्ल्यापर्यंत लढवलेल्या खटल्यात राष्ट्रहित आणि राष्ट्राची प्रतिमा कायम राहावी, याकडे लक्ष दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगभरात भारताचे नाव आदराने घेतले जाते. जगभरात भारताची प्रतिमा उंचावत असल्याचे सर्व श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच जाते, असे उज्ज्वल निकम यांनी नमूद केले.
भारताच्या लोकशाहीबाबत पाश्चिमात्य देश कौतुकोद्गार काढतात
ज्या जागेवर मला उमेदवारी दिली आहे, तो मुंबईतील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे, याची मला जाणीव आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व दिवंगत मनोहर जोशी, रामदास आठवले आणि तरुण युवा पूनम महाजन यांनी केले आहे. या सर्वांनी देशहिताचे प्रश्न संसदेत मांडले आहेत. सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा विचारही यांनी केला. त्यामुळे मी आश्वस्त करू इच्छितो की, देशात जे नवीन कायदे अमलात आले आहेत. त्यातून देशाची सुरक्षितता आणि सामान्य माणसाचे जीवन कसे सुधारले जाऊ शकते, याकडे लक्ष देईन. विविधतेत एकदा हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. भारताच्या लोकशाहीबाबत पाश्चिमात्य देश कौतुकोद्गार काढतात, असे उज्ज्वल निकम म्हणाले.
दरम्यान, पूनम महाजन आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर खटल्याच्या निमित्ताने भेटी होत होत्या. पूनम महाजन यांचा होमवर्क पक्का आहे. पूनम महाजन यांची नक्कीच भेट घेईन. गेल्या १० वर्षांपासून पूनम महाजन यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे या मतदारसंघाबाबत पूनम महाजन यांना चांगलीच माहिती आहे. मी त्यांच्याशी सल्लामसलत करेन, असे सांगत उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी दिली, विश्वास दाखवला, याबाबत उज्ज्वल निकम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्राचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.