"काम करुन दुसऱ्याला तिकीट देता हा काय..."; शायना एनसींच्या उमेदवारीवरुन संतापला भाजप नेता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 01:51 PM2024-10-29T13:51:13+5:302024-10-29T13:54:48+5:30

मुंबादेवीतून शायना एनसींना उमेदवारी मिळताच भाजपचे जेष्ठ नेते अतुल शाह यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे.

Senior BJP leader Atul Shah has decided to contest independent election as soon as Shaina NC gets nomination from Mumbaidevi | "काम करुन दुसऱ्याला तिकीट देता हा काय..."; शायना एनसींच्या उमेदवारीवरुन संतापला भाजप नेता

"काम करुन दुसऱ्याला तिकीट देता हा काय..."; शायना एनसींच्या उमेदवारीवरुन संतापला भाजप नेता

Mumbadevi Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आजची शेवटचा दिवस आहे. असं असतानाही महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. अशातच भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी यांना मुंबादेवीतून शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. शायना एनसी यांना मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्याने  भाजप नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते अतुल शाह यांनी बंडखोरी करण्याचे ठरवलं आहे. अतुल शाह हे अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी शाह यांनी निवडणूक म्हणजे संगीत खुर्चीचा खेळ आहे का? असा सवाल शायना एनसी यांना केला आहे.

भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तिकीट दिल्याने स्थानिक भाजप नेत्यांचा भ्रमनिरास झाला. ५१ वर्षीय शायना एनसी यांना मुंबादेवी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या १५ उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर काही तासांतच भाजपच्या प्रवक्त्या शैना यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. याआधी शायना एनसी या वरळी मतदारसंघातून इच्छुक होत्या. ऐनवेळी त्यांचा मतदारसंघ बदलण्यात आला. मात्र यामुळे भाजपकडून इच्छुक असलेल्या अतुल शाह यांनी नाराजी व्यक्त करत कुणालाही उमेदवारी देणे बरोबर नाही असं म्हटलं आहे.

एएनआयला दिलेल्या मुलाखवतीमध्ये अतुल शाह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "पाच वर्ष मतदारसंघात काम केल्यानंतर दुसऱ्याच कुणाला तरी तिकीट दिले जातं. हा काय संगीत खुर्चीचा खेळ आहे का? कुणालाही मतदारसंघात उमेदवारी देणे योग्य आहे का? जेव्हा मुंबादेवी मतदारसंघात पक्षाचे अस्तित्व नव्हते तेव्हा मी कामाला सुरूवात केली आणि नगरसवेक म्हणून निवडून आलो. करोना काळात लसीकरण केंद्र चालवून ५० हजार लोकांचे लसीकरण केले. लाडकी बहीण योजनेसाठी मी १२ हजार महिलांचे अर्ज भरून घेतले आणि त्यापैकी ८ हजार अर्ज पात्र ठरले आहेत," असं अतुल शाह म्हणाले.

"पक्षासाठी मी २४ तास काम केले. त्यानंतरही जर मला उमेदवारी नाकारली जात असेल तर मनाला वेदना होणारच. नेतृत्वाची चूक झाली आहे, त्यांनी आपली चूक सुधारावी. जशी आमच्याकडून चूक होते, तशी नेतृत्वाकडूनही चूक होऊ शकते," असेही  अतुल शाह म्हणाले. त्यामुळे आता निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले भाजप नेते अतुल शहा यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. अतुल शहा आज मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

गोपाळ शेट्टींची बोरीवलीतून बंडखोरी

लोकसभेला उत्तर मुंबईतून उमेदवारी नाकारल्यानंतर विधानसभेसाठी बोरीवलीतून इच्छुक असलेल्या गोपाळ शेट्टी यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर आपण नाराज झालो असून, बोरीवलीकरांच्या सन्मानासाठी अपक्ष लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मंगळवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 
 

Web Title: Senior BJP leader Atul Shah has decided to contest independent election as soon as Shaina NC gets nomination from Mumbaidevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.