मुंबई- मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेसाठी भाजप नेत्यांकडून आज मुंबईत आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी ईडीच्या कारवाया होणार असल्याचा दावा केला आहे. तसेच माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही मविआ नेत्यांची यादी जाहीर केली. यातील अनेकांवर लवकरच कारवाई होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील ट्विटरद्वारे म्हणाले की, ज्या दिवशी ९३च्या बॉम्बस्फोटांनंतर नेमलेल्या समितीचा अहवाल बाहेर येईल, त्यादिवशी अनेकांना तोंड दाखवण्याचीही जागा उरणार नाही. तसेच तुरुंगातही त्यांच्यासाठी जागा उरणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. बुधवारी पहाटे ५ वाजता ईडीचे अधिकारी मलिकांच्या घरी पोहचले होते. त्यानंतर ७ वाजल्यापासून नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी सुरु होती. ८ तासांच्या चौकशीनंतर ईडीनं मलिकांना अटक केली. मलिकांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पेटलं आहे. ईडीने मलिकांना विशेष कोर्टासमोर हजर केले. तेव्हा कोर्टाने नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.
नवाब मलिकांच्या तीन मागण्या कोर्टाकडून मान्य-
नवाब मलिक यांनी कोर्टाकडे केलेल्या तीन मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात दैनंदिन औषधं घेऊ देणं, रोज घरगुती जेवणाची मुभा आणि चौकशीवेळी वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.