Join us

'आदित्य ठाकरेंना काही व्यक्तींनी घटनास्थळी पाहिलंय'; नारायण राणेंच्या आरोपानं पुन्हा खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 11:26 PM

भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई- केंद्रात राहुल शेवाळे यांनी सुशांत सिंह प्रकरणानंतर एयु नावाचे ४४ फोन कॉल झाल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्रात मोठी घडामोड घडली. राहुल शेवाळे यांनी माजी मंत्री आणि ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. याचदरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. 

आदित्य ठाकरे जे सांगत आहेत, की माझा काही संबध नाही. ३२ वर्षांच्या तरुण सगळ्यांना पुरून उरला. अरे, सत्तेचा दुरुपयोग करून एका मुलीवर अत्याचार करून, तिची हत्या करणे हा पुरुषार्थ आहे का? चौकशी होऊ द्या मग त्यांना समजेल, अशी टीका नारायण राणे यांनी केली. तसेच दीशाची आत्महत्या नाही, तर हत्याच आहे. हे पहिल्या दिवसापासून सांगतोय. दिशाची हत्या झाली, यावर मी ठाम आहे. अडीच वर्षे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. एवढचं नाही तर आदित्य ठाकरेंना काही व्यक्तींनी घटनास्थळी पाहिल्याचा दावाही नारायण राणे यांनी केला. 

दिशा सालियान प्रकरणात पोस्टमार्टममध्येही हेराफेरी झाल्याचा आरोपही नारायण राणेंनी केला आहे. आता काही उद्धव ठाकरे यांची सत्ता नाहीये तेव्हा सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत. पुढच्या वेळी तर चित्र आणखी वेगळे असणार आहे, असंही नारायण राणे यांनी यावेळी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी अनेक भ्रष्टाचारही पचवण्याचा प्रयत्न केला, मात्र आता सगळे बाहेर येणार. ग्रामपंचायत निवडणुकीत उडालेला धुव्वा, मोर्चाचा फज्जा आणि आता एसआयटी लावल्यामुळे मातोश्रीत झोप उडालेली आहे, असं नारायण राणे म्हणाले. 

शेवाळेंचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप-

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी थेट लोकसभेत आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह रजपूत याच्या मृत्यूचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. सुशांतसिंह रजपूर यांच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला AU नावाने ४४ कॉल आले होते. AU म्हणजे आदित्य आणि उद्धव आहेत का? असा प्रश्न लोकसभेत खासदार राहुल शेवाळे यांनी उपस्थित केला. लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. 

आमदार नितेश राणे काय म्हणाले?

एका मुलीचा संशयास्पद मृत्यू होतो आणि त्याची चौकशी मुंबई पोलीस करतात. त्या चौकशीत दोनदा तपास अधिकारी बदलला जातो. ८ जूनच्या रात्री कोण कोण उपस्थित होता. कुणाच्या राजकीय दबावापोटी हे प्रकरण दडपण्यात आले. दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे नसून मुंबई पोलिसांकडे ही केस आहे. सीसीटीव्ही फुटेज का गायब करण्यात आले. ८ जूनच्या पार्टीत कोण होते? या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. त्या रात्री कुठला मंत्री होता? काहीतरी लपवण्यासाठी विरोधक गोंधळ घालतायेत का? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणेंनी केला.  सरकारने या प्रकरणाची फेरचौकशी करावी अशी मागणी सत्ताधारी आमदारांकडून करण्यात आली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"   

टॅग्स :आदित्य ठाकरेनारायण राणे उद्धव ठाकरेपोलिस