मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते सरदार तारा सिंग यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील मुलुंड मतदारसंघाचं बरीच वर्षं आमदार म्हणून सरदार तारा सिंग यांनी प्रतिनिधित्व केलं. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केलं आहे. “माझे वरिष्ठ सहकारी, भाजपा नेते सरदार तारा सिंग यांचे आज सकाळी लीलावती रुग्णालयात प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो,” असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.
सरदार तारा सिंग यांनी मुंबई महापालिकेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी नगरसेवक ते आमदार असा प्रवास केला. . तसेच 5 वेळा ते नगरसेवक राहिले आहेत. सरदार तारा सिंग हे मुंबईतील मुलुंड मतदारसंघातून सलग चार वेळा आमदारपदी निवडून गेले होते. मात्र 2019मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. 2018मध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. गेल्या वर्षी सरदार तारा सिंग यांचा मुलगा रणजित सिंग याला मुंबई पोलिसांनी पंजाब नॅशनल बँक कथित घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती.