ज्येष्ठ सुलेखनकार कमल शेडगे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 06:05 AM2020-07-05T06:05:13+5:302020-07-05T06:05:49+5:30
मराठी नाटकांसाठी सुलेखन करत असतानाच त्यांनी मराठी पुस्तके, मासिके आणि दिवाळी अंकांसाठी सुलेखन करायला सुरुवात केली. मराठीतील ‘माहेर’, ‘दीपावली’ या दिवाळी अंकांचे सुलेखन त्यांचे आहे. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या ‘कालनिर्णय’ या दिनदर्शिकेचे सुलेखनही त्यांनीच केले.
मुंबई : मराठी सुलेखन क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आणि नाट्य सुलेखनातील तपस्वी कमल शेडगे यांचे शनिवारी मुलुंड येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा अक्षर हादेखील सुलेखन क्षेत्रात कार्यरत आहे.
शेडगे यांचा सुलेखन प्रवास हा सहा दशकांहून अधिक काळाचा आहे. त्यांनी १९६० च्या दशकात एका मराठी दैनिकातून कामाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे मित्र नाट्यनिर्माते मोहन वाघ यांनी ‘चंद्रलेखा’ या नाट्य संस्थेला सुरुवात केल्यानंतर कमल शेडगे यांनी नाटकांसाठी सुलेखन करायला सुरुवात केली. त्यानंतर ५० वर्षे त्यांनी मराठी नाटकांसाठी सुलेखन केले. यात ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘गारंबीचा बापू’, ‘स्वामी’, ‘लग्नाची बेडी’, ‘नागमंडल’, ‘शुभमंगल सावधान’, ‘क्रॉस कनेक्शन’ यासारख्या अनेक नाटकांचा समावेश आहे. २०११ साली त्यांनी आपले परममित्र मोहन वाघ यांच्या आठवणी जागवण्यासाठी चंद्रलेखाच्या ८० नाटकांसाठी केलेल्या सुलेखनाचे प्रदर्शन आयोजित केले होते. यात अनेक दिग्गजांनी या कलाकाराच्या कलेला दाद दिली.
मराठी नाटकांसाठी सुलेखन करत असतानाच त्यांनी मराठी पुस्तके, मासिके आणि दिवाळी अंकांसाठी सुलेखन करायला सुरुवात केली. मराठीतील ‘माहेर’, ‘दीपावली’ या दिवाळी अंकांचे सुलेखन त्यांचे आहे. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या ‘कालनिर्णय’ या दिनदर्शिकेचे सुलेखनही त्यांनीच केले.
मराठी नाटकांनंतर त्यांनी आपल्या सुलेखनकलेचा वापर मराठी आणि हिंदी सिनेमांची टायटल तयार करण्यासाठी सुरू केला. ‘बयो’, ‘एक फुल्ल तीन हाफ’, ‘एक रात्र मंतरलेली’ अशा काही सिनेमांची टायटल्स त्यांनी तयार केली. हिंदीतही ‘भूलभुलैय्या’, ‘प्यारे मोहन’, ‘सरकार राज’, ‘उमराव जान’ आणि ‘द्रोणा’ अशा अनेक सिनेमांच्या शीर्षकांचे सुलेखन कमल शेडगे यांच्या कुंचल्यातून तयार झाले.
शेडगे यांनी सुलेखन क्षेत्राला व्यावसायिक रूप मिळवून देण्यात मोठे योगदान दिले. आपल्या रेषांमधून त्यांनी या नावांना असे काही जिवंत केले की प्रेक्षकांच्या हृदयात ही नावे कायमची कोरली गेली. त्यांच्या जाण्याने सुलेखन क्षेत्रातील एक तपस्वी ऋषी आपल्यातून निघून गेल्याची भावना कलाक्षेत्र आणि नाट्यसृष्टीतूनही व्यक्त होते आहे.