मुंबई :गेली अनेक वर्षे मराठी नाट्य आणि चित्रपट समीक्षा करणारे ज्येष्ठ पत्रकार दीनानाथ घारपुरे यांचे बुधवारी अकस्मात निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी रात्री त्यांच्या पार्थिवावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने बुधवारी त्यांना नायर रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.दीनानाथ घारपुरे यांची कारकीर्द ‘आकाशवाणी’त बहरली. मुंबई, पुणे, नाशिक तसेच जाहिरात प्रसारण सेवा आदी केंद्रांवर त्यांनी काम केले.‘आकाशवाणी’चे कष्टाळू व प्रामाणिक अधिकारी म्हणून सहकारी व श्रोत्यांमध्ये ते परिचित होते. निवृत्तीनंतर त्यांनी मुक्त पत्रकारिता करत, अनेक वर्षे मराठी नाटक व चित्रपटांचे समीक्षालेखन केले. शेवटपर्यंत ते सक्रिय होते. अलीकडेच त्यांनी स्वत:चे यु-ट्यूब चॅनेल सुरू केले होते. काही वर्षे राज्य नाट्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणूनही काम पाहिले होते. त्यांच्या युवावस्थेत त्यांनी नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या.संपूर्ण राज्यभर त्यांनी स्नेहीजन जोडले. त्यांचा मित्रपरिवार दांडगा होता. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी त्यांच्या उमेदवारीच्या काळात, दीनानाथ घारपुरे यांच्या गिरगाव येथील निवासस्थानी वास्तव्यास होते. त्यांच्या निधनाबद्दल मोहन जोशी तसेच ‘आकाशवाणी’ परिवार आणि नाट्यसृष्टीतील मान्यवरांनीही शोक व्यक्त केला.
ज्येष्ठ सिनेनाट्य समीक्षक दीनानाथ घारपुरे कालवश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 7:25 AM