मुंबई : अमेरिकेतील मित्राचा फोटो व्हॉट्सॲप डीपीवर ठेवून त्याच्या नावाने ज्येष्ठ नागरिकाला १० लाखांचा गंडा घालणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी शिताफीने तपास करून, ठकसेनला अटक केली. सम्राट सुरेंद्रकुमार चौधरी (वय ४६ रा.कांदिवली) असे त्याचे नाव आहे. मध्य विभाग सायबर विभागाचे वरिष्ठ निरीक्षक संजय गोविलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिताफीने त्याचा तपास केला.
ज्येष्ठ नागरिक अजय मेहता यांना काही दिवसांपूर्वी एकाने अनोळखी क्रमांकावरून त्यांच्या व्हॉट्सॲपवर मेसेज केला. त्याने आपण अमेरिकेतील मित्र श्रीराम सोमेश्वर असल्याचे सांगत, त्यांचा फोटो व्हॉट्सॲप डीपीवर ठेवला होता. त्याने आपल्याला तातडीने १० लाखांची आवश्यकता असून, बँक खात्यावर भरण्यास सांगितले. त्यानंतर, काही दिवसांनी मेहता हे त्याला आपली रक्कम परत मागू लागल्यानंतर, त्याने डीपीवर बंदुकीचे फोटो टाकून त्यांना धमकावू लागला. मेहता यांना संशय आल्याने त्यांनी सोमेश्वर यांना दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधला असता, त्याने आपण कोणाकडूनही पैसे घेतले नसल्याचे सांगितले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक संजय गोविलकर, उपनिरीक्षक अमर कांबळे, नीलेश हेबाडे यांनी एक विशेष पथक नेमून आरोपीचा शोध घेतला. संबंधित व्यक्ती हा कांदिवली परिसरात राहत असल्याचे उघड झाल्यानंतर, त्याला अटक केली. सम्राट याने मेहता यांच्याकडून घेतलेल्या रकमेपैकी आठ लाख १३ हजार रुपये विविध बँक खात्यात वर्ग केले होते. ही रक्कम गोठविण्यात आली आहे.