नात्याचे ओझे झाले, ज्येष्ठ नागरिकांनाही हवा घटस्फोट; दोनवरून २५ टक्क्यांपर्यंत गेले प्रमाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 08:57 AM2023-04-14T08:57:17+5:302023-04-14T08:57:42+5:30
पण बदलत्या समाजानुसार याच वयात पती-पत्नी या नात्याचे ओझे सहन होत नाही म्हणून ते उतरवण्याची धडपड करणारी जोडपीही अनेक दिसतात.
मुंबई :
आयुष्यभर धावपळ करून साथीदाराबरोबर न मिळालेले क्षण ते आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा जगता यावेत, यासाठी धडपड करणारे अनेक वृद्ध दाम्पत्य आजूबाजूला पाहायला मिळतात. पण बदलत्या समाजानुसार याच वयात पती-पत्नी या नात्याचे ओझे सहन होत नाही म्हणून ते उतरवण्याची धडपड करणारी जोडपीही अनेक दिसतात. अगदी ७५ पार झालेल्या नवऱ्यालाही आपल्या पत्नीला मालमत्तेतला हिस्सा द्यावा लागू नये, यासाठी घटस्फोट मगितल्याची अनेक उदाहरणे आहेत.
गेल्या काही महिन्यांत १,०६८ ज्येष्ठ नागरिकांनी घटस्फोटासाठी अर्ज केले. ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. गेल्या काही वर्षांत या आकडेवारीत वाढ झाल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. गेल्या दहा वर्षांत हे प्रमाण दोन टक्क्यांवरून २५ टक्के झाल्याचे तज्ज्ञ वकिलांचे म्हणणे आहे. दरम्यान, ज्येष्ठांमध्ये घटस्फोटाचे वाढते प्रमाण हे नक्कीच चिंताजनक असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.
नवरा परदेशात गेला की तेथेही विवाह करतो
भारतात एक पत्नी असताना कामानिमित्त परदेशात गेलेला नवरा कधीकधी तिथल्याच स्त्रीशी विवाह करतो. भारतात दुसऱ्या विवाहाला मान्यता नाही म्हणून सांसारिक कर्तव्यातून मुक्त झाल्यावर येथील पत्नीला घटस्फोट देतो, अशीही काही उदाहरणे कुटुंब न्यायालयात पाहायला मिळाली आहेत.
उतारवयात हा मार्ग का निवडावा?
वकिलांच्या मते वृद्धापकाळात साथीदाराचा स्वभाव सहन करण्याची सहनशीलता संपलेली असते. तारुण्यात साथीदाराचा स्वभाव सहन होत नसला तरी समाज, सासू-सासरे, आई- वडील व मुख्य म्हणजे मुलांसाठी सहन केला जातो. मात्र, घरातील वडीलधाऱ्या मंडळींचा आधार गमावल्यावर व मुले मोठी होऊन स्वतंत्र झाल्यावर साथीदाराबरोबर राहण्यासारखे कारण उरत नाही आणि आयुष्यभर जे सोसले ते आता का सोसावे? उरलेले आयुष्य मनासारखे जगता यावे, यासाठी घटस्फोटासारखा मार्ग काही वृद्ध जोडपी निवडतात, असे ॲड. सागर आंबेडकर यांनी सांगितले.
मुलेच देतात वेगळे होण्याचा सल्ला
पालकांमधील वाद किंवा एका साथीदाराने दुसऱ्या साथीदाराला केलेली मारहाण, शिवीगाळ लहानपणापासून पाहिल्याने आर्थिकरीत्या स्वतंत्र झालेली मुलेच कधीकधी पालकांना वेगळे होण्याचा सल्ला देतात किंवा त्यांनी विभक्त होण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देतात, असे ॲड. सागर आंबेडकर यांनी सांगितले.