ज्येष्ठ नागरिकांनो, तोतया पोलिसांपासून सावध राहा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 02:06 AM2021-02-09T02:06:56+5:302021-02-09T02:07:13+5:30
पोलिसांचे आवाहन; कॉर्नर मीटिंगद्वारे सुरू आहे जनजागृती
मुंबई : रस्त्याने एकटे जात असलेल्या वृद्धांना गाठायचे. पुढे पोलीस असल्याची बतावणी करीत विविध कारणे देत, अंगावरील दागिने काढून ठेवायला सांगायचे. त्यानंतर दागिने खिशात ठेवण्याच्या नावाखाली त्यावर हात साफ करून पसार होण्याच्या घटना वाढत आहे. मात्र अशा घटनांपासून सावध राहण्याचे आवाहन मुंबई पोलीस करीत आहेत. अशात कॉर्नर मीटिंगद्वारे पोलीस ज्येष्ठ नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करीत आहे.
विलेपार्ले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही पोलीस मित्रांच्या मदतीने ज्येष्ठ नागरिकांना अशा घटनांपासून सावध राहण्याचे आवाहन करीत आहोत. मुळात पोलीस कधी दागिन्यांबाबत सांगत नाहीत; त्यामुळे असे ठग भेटल्यास चोर चोर म्हणून
ओरडावे अथवा तेथून गर्दीच्या ठिकाणी जावे अथवा एखाद्या दुकानात जाऊन याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
पोलिसांची झोपडपट्टी भागातही विशेष जनजागृती मोहीम सुरू आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाउंटवरून फसवणुकीच्या घटनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. अशाच एका घटनेत ज्येष्ठ नागरिकाला पालिकेने दागिने घालण्यास बंदी घातल्याचे सांगत, त्यांची फसवणूक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.
केवायसी अपडेटच्या नावाखालीही गंडा
केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली ६२ वर्षीय वकिलाच्या खात्यावर डल्ला मारल्याचा प्रकार ताडदेवमध्ये समोर आला आहे.
या प्रकरणी ताडदेव पोलीस अधिक तपास करीत आहेत. अशा प्रकारच्या सायबर गुन्हेगारांसाठी ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट ठरत आहेत.
म्हणे ओळखलत का?
रस्त्यावरून जाताना अचानक पाठीवर थाप पडते आणि ‘ओळखलंत का?’ म्हणत संवाद सुरू होतो आणि यातच ठग बोलण्यात गुंतवून पसार होतात. अशा अनोळखी लोकांपासूनही सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.