ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक तणावग्रस्त; ७१ टक्के ज्येष्ठांना मानसिक आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 06:00 AM2020-01-06T06:00:39+5:302020-01-06T06:00:43+5:30
शारीरिक स्वास्थ्याकडे कायम लक्ष दिले जाते. मात्र, मानसिक स्वास्थ्याकडे आपण कायमच दुर्लक्ष करत असतो.
मुंबई : शारीरिक स्वास्थ्याकडे कायम लक्ष दिले जाते. मात्र, मानसिक स्वास्थ्याकडे आपण कायमच दुर्लक्ष करत असतो. लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच दैनंदिन जीवनात ताणतणावाला बळी पडावे लागते. नुकत्याच इंडियन जर्नल मेंटल हेल्थच्या अहवालात प्रसिद्ध झालेल्या निरीक्षणानुसार ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्वाधिक ताण-तणाव वाढत असून, याविषयी वाच्यता मात्र होत नसल्याचे दिसून आले आहे. या अहवालानुसार, ७१ टक्के ज्येष्ठ नागरिकांना मानसिक आजार असल्याचे आढळले आहे.
सायन रुग्णालयातील मानसोपचार विभागाच्या डॉक्टरांनी हा अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला असून, या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आपल्या मानसिक आजारांविषयी अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे. शहर उपनगरातील जवळपास १०० ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणी अहवालातील हे निष्कर्ष आहेत. ‘इंडियन जर्नल आॅफ मेंटल हेल्थ’ यात हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार, ३३ रुग्णांमध्ये नैराश्य, स्मृतिभ्रंश, आयसोमेनिया, दारूशी संबंधित मानसिक आजार आढळले आहेत. मात्र, याचा त्यांच्या दैनंदिन कामावर कोणताही परिणाम होत नाही, म्हणून त्यांनी कोणतेही उपचार किंवा तपासण्या केलेल्या नाहीत.
या अहवालात ५२.४ टक्के ज्येष्ठ नागरिकांचे शोषण होत असल्याची धक्कादायक बाबही उघडकीस आली आहे. मात्र, यासंबंधी कोणत्याही ठिकाणी तक्रार केलेली नाही, असेही यात नमूद केले आहे. यात मानसिक, शारीरिक, आर्थिक इत्यादी दृष्टिकोनातून होणाऱ्या शोषणाविषयी निष्कर्ष मांडले आहेत. सायन रुग्णालयातील मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. नीलेश शाह आणि संशोधन सहायक डॉ. अविनाश डिसूझा यांनी केले आहे.
>‘डोळसपणे पाहणे गरजेचे’
उतार वयात ज्येष्ठ नागरिकांना अनेक मानसिक प्रश्न भेडसावतात. मनात डोकवणारे नकारात्मक विचार, ताण-तणाव, नात्यांमधील वाढते अंतर, एकटेपणा यांसारख्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. ज्येष्ठांमध्ये नैराश्य, भीती, चिंता या आजारांचे प्रमाण अधिक असून ते कायम दुर्लक्षित राहतात. ज्येष्ठ नागरिकांच्या अशा अनेक प्रश्नांकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे, असे डॉ. नीलेश शाह यांनी सांगितले.