मुंबई : सर्व श्रमिक संघाचे नेते, स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते यशवंत चव्हाण यांचे मंगळवारी सकाळी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले, ते ९७ वर्षांचे होते. पार्थिवावर मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा माधव, दोन नातवंडे निमिषा व जॉय असा परिवार आहे.पुण्यातील रत्न रुग्णालयात सकाळी निधन झाल्यानंतर, पार्थिव अंत्यदर्शनासाठी दादरच्या ‘श्रमिक’ येथे ठेवण्यात आले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पावर यांच्यासह अनेक राजकीय व कामगार नेत्यांनी त्यांना अखेरचा लाल सलाम केला.यशवंत चव्हाण यांनी सर्व श्रमिक संघाची स्थापना केली होती. भारतीय कम्युनिस्ट पक्षात १९४२ साली झालेल्या मतभेदांमुळे कॉम्रेड एस. के. लिमये, भाऊ फाटक आणि लक्ष्मण मेस्त्री यांच्यासह त्यांना पक्षाबाहेर पडावे लागले. त्यानंतर, १९६५ साली भाकपमध्ये फूट पडल्यावर त्यांनी लाल निशाण पक्षाची स्थापनाही केली. मात्र, तब्बल ७५ वर्षांनंतर मतभेदांना तिलांजली देत, वयाच्या ९६व्या वर्षी सहकाºयांसमवेत १८ आॅगस्टला वरळीच्या आदर्शनगर येथील डॉ. खरूडे सभागृहातील विशेष कार्यक्रमात पक्ष व कार्यकर्त्यांसह भाकपमध्ये प्रवेश केला.देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडविलेले संविधान आतून पोखरण्याचे काम सुरू आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्व पुरोगामी, डाव्या, आंबेडकरवादी पक्ष-संघटना संघर्ष आणि प्रबोधनाचे काम करत आहेत. ही एकजूट, श्रमिकांच्या चळवळीला प्रेरणादायी ठरत असताना, चव्हाण यांच्या जाण्याने कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.आपापले पक्षीय मतभेद बाजूला ठेवून कामगार संघटना म्हणून कामगारांनी एकत्र यायला हवे, हे बीज यशवंत चव्हाण यांनी रुजविले. त्यांच्या जाण्याने कामगार वर्गाचे आणि संघटनांचे मोठे नुकसान झाले आहे.- एम. ए. पाटील, कामगार नेते.स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान विसरता येणार नाही. असंघटित कामगारांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी कुटुंबाचाही त्याग केला. नेता म्हणून नव्हे, तर कामगार म्हणून ते जगले.- विश्वास उटगी, सह निमंत्रक, कामगार संघटना संयुक्त कृती समिती.
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. यशवंत चव्हाण यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 3:55 AM