Join us

ठाकरेंनी उमेदवार जाहीर करताच काँग्रेसचा हल्लाबोल; सर्वोच्च नेतृत्वाने हस्तक्षेप करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 11:42 AM

सत्तारूढ महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले असून चर्चेचे गुऱ्हाळ आणि बैठका सुरू आहेत.

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुक पुढच्या आठवड्यात  लागण्याची शक्यता आहे. सत्तारूढ महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले असून चर्चेचे गुऱ्हाळ आणि बैठका सुरू आहेत. पण अद्याप जागावाटपाची अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र त्याआधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकीय खेळी खेळत मुंबईत लोकसभेचा  त्यांचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. 

उद्धव ठाकरेंनी काल सायंकाळी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील अंधेरी पूर्व व जोगेश्वरी पूर्व ,वर्सोवा व अंधेरी पश्चिम येथील चार विधानसभा क्षेत्रातील चार शिवसेना शाखांना भेटी देवून त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.आणि या चारही विधानसभा मतदार संघात त्यांनी शिवसेना उपनेते आणि युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहिर केली. उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यानंतर मुंबई काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी ट्विट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

संजय निरुपम ट्विट करत म्हणाले की, काल संध्याकाळी उरलेल्या शिवसेना प्रमुखांनी अंधेरी येथील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित केला. हे कसे होऊ शकते? महाविकास आघाडीच्या दोन डझन बैठका होऊनही जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. ही जागाही प्रलंबित असलेल्या ८-९ जागांपैकी एक आहे, असे मला जागा वाटप बैठकीमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे. मग शिवसेनेचा उमेदवार जाहीर करणे हे युती धर्माचे उल्लंघन नाही का?, असा सवाल संजय निरुपम यांनी उपस्थित केला. तसेच काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी देखील संजय निरुपम यांनी केली आहे. 

कोण आहेत अमोल कीर्तिकर

युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे जवळचे सहकारी आणि शिवसेना उपनेते आणि युवासेना सरचिटणीस या पदावर ते कार्यरत आहेत. या मतदार संघातील शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचे ते पूत्र आहेत.विशेष म्हणजे १८ मे २०२३मध्ये उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीत त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिल्यावर त्यांनी लगेच कामाला देखिल सुरवात केली असून या मतदार संघात ते प्रत्येक कार्यक्रमांना ते जातीने उपस्थित असतात. 

खासदार गजानन कीर्तिकर यांच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान अमोलला या मतदार संघातून काल ठाकरे यांनी अधिकृत उमेदवारी जाहिर केल्यावर आता त्याचे वडील आणि सलग दोन वेळा खासदार असलेले गजानन कीर्तिकर काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळात आणि मतदार संघात सर्वांचे लक्ष लागले आहे.हा जागा भाजपाला हवी असल्याची जोरदार चर्चा आहे.त्यामुळे अमोल कीर्तिकर विरुद्ध वडील गजानन कीर्तिकर अशी लढत होणार का? किंवा अमोल कीर्तिकर विरुद्ध भाजप तगडा उमेदवार किंवा सेलिब्रेटी देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

टॅग्स :उद्धव ठाकरेलोकसभा निवडणूक २०२४संजय निरुपमकाँग्रेसमहाविकास आघाडी