ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना ‘रंगकर्मी’ सन्मान
By admin | Published: March 21, 2017 02:17 AM2017-03-21T02:17:18+5:302017-03-21T02:17:18+5:30
‘चैत्र चाहूल’तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘रंगकर्मी’ सन्मान आणि ‘ध्यास’ सन्मान या दोन्ही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई : ‘चैत्र चाहूल’तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘रंगकर्मी’ सन्मान आणि ‘ध्यास’ सन्मान या दोन्ही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा ‘रंगकर्मी सन्मान २०१७’ हा पुरस्कार ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि ‘ध्यास सन्मान २०१७’ या पुरस्कारासाठी कांचन सोनटक्के यांची निवड करण्यात आलेली आहे.
या विशेष पुरस्काराचे यंदाचे १२ वे वर्षे आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांचे गेली अनेक वर्षे नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात योगदान आहे. आपल्या कलात्मक निर्मिती आणि दिग्दर्शनाने त्यांनी अनेक उत्तम कलाकृती साकारल्या आहेत. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘ध्यानीमनी’ या चित्रपटाने रसिकांची मने जिंकली. ‘ध्यास’ सन्मानासाठी निवड करण्यात आलेल्या कांचन सोनटक्के या मुले, विविध अपंग, प्रोढकला परफॉर्मिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. अपंग कला परफॉर्मिंगच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर विविध कामे केली आणि अनेक बाल कलाकार घडविले. सोलापूर शहरातील पहिल्या अखिल भारतीय नाट्य परिषद आयोजित बालनाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. बाल रंगभूमीवर त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
या पुरस्कार सोहळ्याचे वितरण मंगळवार २८ मार्च, २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे. ज्येष्ठ समीक्षक कमालकर नाडकर्णी आणि सेवा सहयोग फाउंडेशनचे संचालक संजय हेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा होणार आहे. (प्रतिनिधी)