ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 12:53 PM2018-09-29T12:53:14+5:302018-09-29T13:55:39+5:30
ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर यांचं निधन झालं आहे.
मुंबईः ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. राज्य शासनातर्फे पं. बोरकर यांना 2016मध्ये पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं. त्यांना क्षयरोगानं पछाडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नानावटीमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगी आणि दोन मुलगे आहेत.
तुळशीदास बोरकर यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1934मध्ये गोव्यातील बोरीमध्ये झाला होता. 50 हून अधिक वर्षे त्यांनी कलाकारांबरोबर शास्त्रीय गायन मैफलीत साथसंगत केली. स्वतंत्र हार्मोनियमवादनात त्यांनी जपलेले वेगळेपण हे कायम लक्षात राहण्यासारखं आहे, नाट्यसंगीतातील लक्षणीय ऑर्गनवादन अनेकांना आकर्षित करत असे, तसेच त्यांनी मोठ्या प्रमाणात शिष्य घडवले आहेत. पं. तुळशीदास बोरकर हे मूळचे गोव्यातील बोरी गावचे होते. त्यांचे चौथीपर्यंतचे शालेय शिक्षण बोरीमध्ये झाले, तर पुढचे शिक्षण सिंधुदुर्गातील सावंतवाडीमध्ये झाले आहे.
बोरी गावातल्या नवदुर्गा मंदिरात बालपणी कीर्तनं आणि प्रवचन करता करताच त्यांच्यावर हार्मोनियमचे संस्कार झाले. त्यांच्या आई जयश्री या गायक होत्या, तसेच त्या नाटकातूनही काम करायच्या. तर मोठी बहीण नलिनी बोरकर या कलाविकास नाट्य संस्थेत काम करत होत्या. त्यामुळे लहानपणापासूनच ते घडत गेले.