वरिष्ठ निरीक्षकाला लाच घेताना अटक

By admin | Published: December 30, 2015 01:27 AM2015-12-30T01:27:43+5:302015-12-30T01:27:43+5:30

अनधिकृत जागेवर उभारलेल्या स्टुडिओबाबत कारवाई न करण्यासाठी ३ लाखांची लाच घेताना एमएचबी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष चव्हाण (वय ५८) यांना मंगळवारी सायंकाळी अटक

Senior inspector arrested for taking bribe | वरिष्ठ निरीक्षकाला लाच घेताना अटक

वरिष्ठ निरीक्षकाला लाच घेताना अटक

Next

मुंबई : अनधिकृत जागेवर उभारलेल्या स्टुडिओबाबत कारवाई न करण्यासाठी ३ लाखांची लाच घेताना एमएचबी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष चव्हाण (वय ५८) यांना मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली. बोरीवली (प.) येथील आरसीएफ चर्च येथील हॉटेलमध्ये रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली.
विशेष म्हणजे सेवा ज्येष्ठतेमुळे चव्हाण यांचे नाव सहायक उपायुक्तांच्या बढती यादीत होते. येत्या पंधरवड्यात या बढत्या होणार आहेत. आता बढती तर दूरच पण त्यांचे निलंबन होऊन खातेनिहाय चौकशीला त्यांना सामोरे जावे लागेल.
बोरीवली (प.) किनारपट्टीजवळ वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीकडे सुमारे ४ एकर भूखंड आहे. त्या ठिकाणी त्याने चित्रीकरण स्टुडिओ सुरू केला होता. हा स्टुडियो अनधिकृत असल्याची निनावी तक्रार पोलिसांकडे आली होती.
या प्रकरणी कारवाईचा इशारा देत प्रकरण दडपून टाकण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक सुभाष चव्हाण
यांनी ४ लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. रचलेल्या सापळ्यानुसार त्याने
चव्हाण यांची भेट घेऊन ३ लाख देण्याचे मान्य करत आरसीएफ चर्चजवळील हॉटेलात त्यांना बोलाविले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास चव्हाण यांना ३ लाख रुपये स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. (प्रतिनिधी)

निवृत्तीला होते अवघे पाच महिने
- सुभाष चव्हाण हे १९८६च्या बॅचचे उपनिरीक्षक आहेत. ते मूळचे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर गावचे आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीला पाच महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. गृहविभागाने नुकतीच एसीपीपदी बढती देण्याबाबत माहिती मागविली होती. त्या अधिकाऱ्यांच्या यादीत चव्हाण यांचे नाव होते.
- फिर्यादी हा चव्हाण यांच्या चांगल्या परिचयाचा असून, तो वारंवार पोलीस ठाण्यात भेटण्यासाठी येत असे. मात्र या प्रकरणात चव्हाण यांनी त्याच्याकडे पैशांचा ससेमिरा लावल्याने त्याने ‘ट्रॅप’ करण्याचे ठरवून तक्रार दिली. तो ओळखीचा असल्याने चव्हाण यांना त्याच्याबाबत संशय आला नाही; आणि ते एसीबीच्या जाळ्यात अडकले.

Web Title: Senior inspector arrested for taking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.