Join us

वांद्रे गर्दीप्रकरणानंतर वरिष्ठ निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ यांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 2:54 AM

वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ यांची वाहतूक विभागात बदली

मुंबई : वांद्रे गर्दीप्रकरणानंतर वांद्रे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ यांची वाहतूक विभागात बदली करण्यात आली. त्यांच्यासह १० अधिकाऱ्यांच्या बदल्या गुरूवारी करण्यात आल्या.वांद्रे स्थानकाजवळ परप्रांतीय मजुर एकत्र आले आणि त्यांनी मदत नको, गावी जायचे आहे, अशी भूमिका घेत १४ एप्रिल रोजी आंदोलन केले. सौम्य बळाचा वापर करत पोलिसांना ही गर्दी पांगवावी लागली. यात चौकशीवरून १० जणांना अटक झाली. ‘शासनाकडून १५ हजार रुपये मिळणार आहेत, रेल्वे सुरू होणार असून दुपारी विशेष गाडी सुटणार आहे, इथे मरण्यापेक्षा गावी जाऊ...’ अशी ओरड आरोपींनी केल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले. या सर्वांचे भ्रमणध्वनी तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. मात्र लॉकडाउनच्या काळात इतके मजूर रस्त्यावर येत असताना वांद्रे पोलिसांना जराही सुगावा न लागणे याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले. तसेच हिरेमठ यांच्या बदलीची मागणीही जोर धरत होती. अखेर, गुरूवारी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी प्रशासकीय कारणात्सव केलेल्या १० अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या यादीत त्यांचाही समावेश करत त्यांची वाहतूक विभागात बदली केलीे. तर त्यांच्या जागी मुख्य नियंत्रण कक्षातील वरिष्ठ पोलीस निरिक्षक निखिल कापसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याचबरोबर भोईवाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शिरीष सावंत यांची गुन्हे शाखेत तर त्यांच्या जागी गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त संगीता पाटील यांची नेमणूक केली. मध्य नियंत्रण कक्षात बदली केलेल्या पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांची पुन्हा गुन्हे शाखेत नियुक्ती केली. काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय बसवत यांची सशस्त्र पोलीस दलात बदली केली. काळाचौकी पोलीस ठाण्याची धुरा सशस्त्र पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरिक्षक गोकुळसिंंह पाटील यांच्याकडे असेल. विशेष शाखा एकचे सहायक पोलीस आयुक्त दिनेश देसाई अंधेरी विभागाची जबाबदारी पाहतील. त्यांच्या रिक्त जागी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातील सहायक पोलीस आयुक्त प्रशांत मर्दे यांची नियुक्ती झाली. तर, मुख्यालय दोनचे सहायक पोलीस आयुक्त माणिकसिंह पाटील यांची कुलाबा विभागाच्या सहायक आयुक्त पदावर नियुक्ती झाली.