ज्येष्ठ पत्रकार जे. डे हत्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन दोषी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 11:58 AM2018-05-02T11:58:46+5:302018-05-02T12:14:35+5:30
ज्येष्ठ पत्रकार जे. डे हत्या प्रकरणात छोटा राजनला दोषी ठरवण्यात आले आहे.
मुंबई - ज्येष्ठ पत्रकार जे. डे हत्या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दोषी ठरवण्यात आले असून पत्रकार जिग्ना वोरा व पॉल्सन जोसेफची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. छोटा राजनसहीत 9 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी आणि दीपक सिसोदिया हे नऊ जण दोषी सिद्ध झाले आहेत. मुंबईतील विशेष मकोका न्यायालयानं हा निकाल दिला आहे. छोटा राजनला काय शिक्षा सुनावली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
11 जून 2011 रोजी डे दुचाकीवरून पवई येथील निवासस्थानी जात असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. पाच गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झालेले डे यांचा हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झाला. मुंबई गुन्हे शाखेने सखोल तपास करून डे यांची हत्या संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या छोटा राजनच्या इशाऱ्यावरून घडल्याचे स्पष्ट केले.
डे यांच्यावर गोळ्या झाडणारा सतीश थंगप्पन जोसेफ ऊर्फ सतीश काल्या आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून या हत्याकांडासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केलेल्या, सहभाग घेतलेल्या एकूण 12 आरोपींना मकोकान्वये गजाआड करण्यात आले होते. यामध्ये पत्रकार जिग्ना वोराचाही समावेश होता.
दरम्यान, सीबीआयच्या म्हणण्यानुसार, डे यांनी लिहिलेल्या एका पुस्तकामुळे राजन अस्वस्थ होता आणि त्यात डे यांना मारण्यासाठी जिग्ना वोरा हिने चिथावणी दिली. त्यामुळे छोटा राजननं डे यांना मारण्यासाठी काही गुंडांना सुपारी दिली.
Gangster Chhota Rajan convicted in journalist Jyotirmay Dey murder case, while journalist Jigna Vora & Joseph Paulsen acquitted by MCOCA court in Mumbai. pic.twitter.com/6lNvxVrBsQ
— ANI (@ANI) May 2, 2018