ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 07:05 AM2019-11-22T07:05:37+5:302019-11-22T07:14:15+5:30
दुपारी चंदनवाडी स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
मुंबई: ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचं पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं आहे. दुपारी 3 वाजता चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. त्याआधी अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव नवाकाळ कार्यालयात ठेवण्यात येईल. खाडिलकर यांनी त्यांच्या अग्रलेखांच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध लिखाण केलं.
नीळकंठ खाडिलकर नवाकाळचे अनेक वर्ष संपादक होते. या काळात महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांनी अग्रलेखांमधून भाष्य केलं. खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या. वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू आणि विवेकी विवेचन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं.
दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे संपादक म्हणून खाडिलकर यांनी जवळपास २७ वर्षे काम केलं. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’चे भूतपूर्व संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होते. ते संध्याकाळ या नावाचे सायंदैनिकही काढत असत. निळूभाऊ खाडिलकरांचं 'हिंदुत्व' हे पुस्तक समीक्षकांच्या व वाचकांच्या पसंतीस उतरलं.