लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचे मंगळवारी सकाळी ७.५८ वाजता विलेपार्ले पश्चिम येथील कूपर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्याचा आठवड्यात कोरोनावर मात करून ते घरी परतले होते. परंतु साेमवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तीन आठवड्यांपूर्वी त्यांच्या पत्नी क्षमा नार्वेकर यांचेही कोरोनाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई असा परिवार आहे.
कोविड नियमानुसार नार्वेकर यांच्यावर मुलगी जयश्री, शिल्पा आणि जावई बिमल पारिख या निकटवर्तीयांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी पत्रकारितेत नार्वेकर सुमारे पाच तप कार्यरत हाेेते. नार्वेकर यांनी लिहिलेले ‘सेवानिवृत्त झालात, आता पुढे काय?’ हे पुस्तक लोकप्रिय ठरले. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला.
कोकणातील आरोंदा या गावातून मुंबईत आलेल्या नार्वेकर यांनी कोकणची बांधिलकी अखेरपर्यंत जपली. लोणावळा येथील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या दि. गो. तेंडुलकर स्मृतिमंदिर उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मुंबईतील अनेक नामवंत पत्रकार आणि संपादक घडविण्यासाठी नार्वेकर यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे.
* महाराष्ट्र एका अभ्यासू पत्रकाराला मुकला
ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्र एका अभ्यासू पत्रकार व सुहृद व्यक्तिमत्वाला मुकला आहे.
- भगतसिंग कोश्यारी, राज्यपाल
* निर्भीड पत्रकार गमावला
आपली लेखणी समाजहितासाठी झिजविणारा आणि पत्रकारितेतील नव्या पिढीला बातमीदारीची ओळख करून देणारा निर्भीड पत्रकार आपण गमावला आहे.
-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
* लढाऊ पत्रकार काळाच्या पडद्याआड
शेतकरी, कष्टकरी बांधवांशी नाळ जुळलेला, सर्वसामान्यांच्या व्यथांशी समरस झालेला, गिरणी कामगारांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारा लढाऊ पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेचा एक अध्याय संपला.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
...............................