लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे संस्थापक तसेच ज्येष्ठ पत्रकार, लेखक अनिल धारकर (वय ७४) यांचे शुक्रवारी निधन झाले. ते हृदयविकाराने त्रस्त होते. बायपास शस्त्रक्रियेसाठी नुकतेच त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पत्रकार, लेखक, वास्तुविशारद अशा अनेक क्षेत्रात त्यांचा गेली पाच दशके वावर होता. सेन्सॉर बोर्डाच्या सल्लागार समितीचे ते सभासद होते. त्याशिवाय आघाडीच्या इंग्रजी दैनिकांचे संपादकपदही त्यांनी भूषवले होते. दक्षिण मुंबईत आर्ट मुव्ही थिएटर (आकाशवाणी सभागृहात) सुरू करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ‘टाटा लिटरेचर लाइव्ह’चे उद्गाते म्हणूनही त्यांची ओळख होती.
महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेवर आधारित 'द रोमॅन्स ऑफ सॉल्ट' या पुस्तकाचे लेखन धारकर यांनी केले. दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांचे निर्माता, सूत्रसंचालक, त्याचप्रमाणे वृत्त वाहिन्यांचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांच्या जाण्याने साहित्य आणि कला क्षेत्राची अपरिमित हानी झाली, अशा शब्दांत अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली व्यक्त केली.
.....................................