मुंबई : मुंबईत गेल्या वर्षी मार्चपासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. तोपुन्हा फेब्रुवारीपासून वाढू लागला आहे. तो कमी व्हावा म्हणून मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू केले आहे. मुंबईत आतापर्यंत १४ लाख ७१ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. महापालिकेला पुढील लसीचा साठा १५ एप्रिलला मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत रोज ५० ते ५२ हजार लाभार्थ्यांना लसीकरण केले जाते. पुढील तीन दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा असल्याने मुंबईत लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत ६ एप्रिलपर्यंत एकूण १४ लाख ७१ हजार नागरिकांनी लस घेतली आहे. मुंबईत पहिला डोस घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या १ लाख ७८ हजार ४८८ आहे; तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ८८ हजार ६६ आहे. पहिला डोस घेणाऱ्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची संख्या १ लाख ७३ हजार ६२ आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ७४ हजार ८६० आहे. मुंबईत एकूण २ लाख ५४ हजार ४४५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी, तर २ लाख ६७ हजार ८८९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लस घेतली. साठ वर्षांवरील ६ लाख २० हजार ७३४ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले, तर ४५ ते ५९ वयोगटातील ३१ लाख ८ हजार ८५४ लाभार्थ्यांनी लस घेतली.
सध्या मुंबईत १ लाख ८५ हजार लसीचा साठा शिल्लक आहे. त्यामध्ये कोव्हिशिल्ड लसीचा १ लाख ७६ हजार तर कोव्हॅक्सिनचा ८ हजार ८४० इतकाच साठा शिल्लक आहे. मुंबईत खासगी, सरकारी - पालिका रुग्णालयांमध्ये दोन पाळ्यांमध्ये लसीकरण केल्यामुळे दुपारनंतर लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या अधिक दिसून येत आहे. शिवाय, संकेतस्थळावर नोंदणी करून येणाऱ्यांच्या तुलनेत वाॅक इन लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात लाभार्थी येत असल्याची माहिती नायर रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली.
...............