ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरी जुकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 09:51 PM2020-02-17T21:51:43+5:302020-02-17T21:53:25+5:30
पंढरीदादा जुकर यांचे खरे नाव ‘नारायण हरिशचंद्र जुकर’ असे होते. मात्र संपूर्ण चित्रपट आणि नाट्यसृष्टी त्यांना ‘पंढरीदादा’ या नावानेच ओळखत असे
मुंबई - ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरी जुकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेली ६५ वर्षे रंगमंच, मोठा आणि छोटा पडदा खऱ्या अर्थाने ‘रंगवणारे’ रंगभूषाकार म्हणून पंढरीदादा जुकर यांना ओळखले जाते.
पंढरीदादा जुकर यांचे खरे नाव ‘नारायण हरिशचंद्र जुकर’ असे होते. मात्र संपूर्ण चित्रपट आणि नाटय़सृष्टी त्यांना ‘पंढरीदादा’ या नावानेच ओळखत असे. ‘राजकमल कला मंदिर’, ‘यशराज फिल्म्स’, ‘बालाजी टेलीफिल्म्स’ यांसारख्या अनेक प्रॉडक्शन हाउससाठी त्यांनी काम केले. मधुबाला, मीनाकुमारी, दिलीपकुमार, अमिताभ बच्चनपासून माधुरी दीक्षित, काजोल आणि सध्या सुरू असलेल्या हिंदी-मराठी मालिकांमधल्या अनेक नव्या चेह-यांचं सौंदर्य खुलतं ते पंढरीदादांच्या हाती असलेल्या जादूमुळे. रंगभूषेतल्या कारकिर्दीचा श्रीगणेशाच ज्यांच्या चेह-यावर रंगभूषा करून झाला त्या व्ही. शांताराम यांच्या नावे महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०१३’ यंदा पंढरीदादा जुकर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला होता.