ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक पद्मश्री वनराज भाटिया यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:06 AM2021-05-08T04:06:22+5:302021-05-08T04:06:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक पद्मश्री वनराज भाटिया यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ९३ वर्षांचे हाेते. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक पद्मश्री वनराज भाटिया यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ९३ वर्षांचे हाेते. दीर्घकाळ वार्धक्याशी संबंधित आजारांनी त्रस्त होते. नेपियन्सी रोड (मलबार हिल) परिसरातील घरात ते एकटेच राहत होते.
भारतीय आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक अशी ख्याती असलेल्या भाटिया यांनी ८० च्या दशकात संगीत क्षेत्रात नवनवे प्रयोग केले. ३१ मे १९२७ रोजी एका गुजराती कुटुंबात त्यांचा जन्म झाला हाेता. त्यांनी ७ हजारांपेक्षा जास्त जाहिरातींसाठी जिंगल्स तयार केली. १९७४ मध्ये श्याम बेनेगल यांच्या ‘अंकुर’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दूरदर्शनवरील ‘भारत एक खोज’ या कार्यक्रमाने त्यांचे नाव घराघरात पोहोचवले. ‘खानदान’, ‘वागले की दुनिया’ यांसह अनेक मालिका आणि चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.
‘मंथन’, ‘भूमिका’, ‘जाने भी दो यारो’, ‘३६ चौरंगी लेन’, ‘द्रोहकाल’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. १९८८ साली ‘तमस’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९८९ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१२ साली भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या निधनामुळे संगीत, सिनेक्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली.
.....................................