मुंबई - उदयनराजे भोसले यांनी आपण छत्रपतींचे वासर असल्याचे पुरावे द्यावेत, या शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरून सध्या राज्यात वादाता तोंड फुटले आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी समर्थन दिले आहे. ''गादीचे वारस वेगळे आणि रक्ताचे वारस वेगळे, असे विधान नवाब मलिक यांनी केले आहे.
दरम्यान, राज्यसभेचे तिकीट मिळावे, यासाठी उदयनराजे भोसले यांनी लोटांगण घातले आहे, असा टोलाही मलिक यांनी लगावला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक म्हणाले की, ''देशात गादीचे वारस असलेले आणि रक्ताचे नाते असलेले अनेक राजे आहेत. दरम्यान, संजय राऊत यांनी उदयनराजे हे महाराजांचे गादीचे वासर आहेत की रक्ताचे वारस आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. आता उदयनराजेंनी संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर द्यावे.'' ‘लोकमत’च्या वतीने पुण्यात बुधवारी आयोजित लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात राऊत यांची विशेष मुलाखत घेण्यात आली होती. यावेळी राऊत यांनी उदयनराजेंवर जोरदार टीका केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा, कोल्हापूरच्या गादीचा आम्ही आदरच करतो. महाराजांचे नाव जिथे येते, तिथे आम्ही नतमस्तकच होतो. पण शिवाजी महाराज ही कोणाचीही मक्तेदारी नाही. स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणविणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असे आव्हान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले होते. तसेच शरद पवार यांना जाणता राजा ही उपाधी जनतेने दिली आहे. रक्षणकर्ता राजा असतो, लुटणारा राजा नसतो, असाही चिमटा त्यांनी काढला होता.