वरिष्ठ, सहकाऱ्यांविरुद्ध खोट्या तक्रारी करणा-या पोलिसांवर कारवाईचा बडगा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 05:50 AM2019-07-19T05:50:26+5:302019-07-19T05:50:35+5:30
वैयक्तिक हेवेदाव्यातून वरिष्ठ पोलीस अधिकारी, सहकाऱ्यांना त्रास देण्यासाठी खोट्या तक्रारी करणा-या पोलिसांना आता कारवाईला सामोरे जावे लागेल.
- जमीर काझी
मुंबई : वैयक्तिक हेवेदाव्यातून वरिष्ठ पोलीस अधिकारी, सहकाऱ्यांना त्रास देण्यासाठी खोट्या तक्रारी करणा-या पोलिसांना आता कारवाईला सामोरे जावे लागेल. विनाकारण त्रास देण्यासाठी जाणीवपूर्वक तक्रार अर्ज करणाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी नुकतेच सर्व घटकप्रमुखांना दिले आहेत.
वैयक्तिक आकसातून त्यांच्याविरुद्ध चौकशीचा ससेमिरा लावण्यासाठी एकमेकांविरुद्ध तक्रार करणाºयांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा प्रकरणांचा त्वरित निपटारा करून संबंधिताविरुद्ध तातडीने कारवाई केली जाणार असल्याचे अतिवरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.
शिस्त आणि अनुशासन याला महत्त्व असलेल्या पोलीस दलामध्येही मिळकतीच्या ठिकाणी नियुक्ती, क्रीम पोस्टिंग, वरिष्ठ अधिकाºयांच्या मर्जीतील अधिकाºयांना बढती अशा विविध कारणांमुळे अधिकारी, अंमलदारांमध्ये एकमेकांविरुद्ध आकस व शत्रुत्व वाढलेले आहे. त्यामुळे आपला विरोधक असलेल्या वरिष्ठ, सहकाºयाविरुद्ध एखाद्या नागरिकाला हाताशी धरून त्याच्यामार्फत तक्रार अर्ज करणे, त्याच्यावरील आरोपासंबंधी अधीक्षक, आयुक्तांकडे निवेदन देऊन चौकशीची मागणी करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढले आहेत.
माहिती अधिकार कायद्यान्वये मिळालेल्या अधिकारानुसार यासंबंधी केलेल्या तक्रार अर्जावर केलेल्या कार्यवाहीचा पाठपुरावाही संबंधितांकडून केला जातो. त्यामुळे यासंबंधीच्या तक्रार अर्जावर वरिष्ठ अधिकारी, प्रशासनाला निर्धारित मुदतीत चौकशी करून कार्यवाही करणे अपरिहार्य आहे. त्याचा परिणाम दैनंदिन कामकाज व शासकीय कामावर होत आला आहे. अनेकदा या अर्जाच्या पडताळणी, चौकशीतून काहीही निष्पन्न होत नाही, अनेक आरोप खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे अधिकाºयांचा वेळ वाया जातो, तसेच चौकशी झालेल्या अधिकारी, अंमलदाराचे मानसिक खच्चीकरण होऊन त्यांच्यात नैराश्याची भावना निर्माण होते. जोमाने काम करण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे अशा तक्रार अर्ज करणाºयांचा शोध घेऊन त्यामागील खरा ‘कर्ता करविता’ कोण आहे, याचा शोध घेण्याची सूचना महासंचालकांनी घटकप्रमुखांना केली आहे.
>भ्रष्टाचार, अनैतिक संबंधांबाबत अधिक तक्रारी
पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि अंमलदारांविरुद्ध तक्रार अर्जामध्ये बहुतांश तक्रारी या पदाचा गैरवापर करून कोट्यवधीची मालमत्ता जमविली किंवा गैरमार्गाने अतिरिक्त कमाई तसेच खात्यातील महिला अधिकारी, कर्मचाºयांशी अनैतिक संबंध असल्याबाबतच्या तक्रारी असतात. काही अर्जांमध्ये तथ्य असले तरी अनेक तक्रारी या वैयक्तिक हेवेदाव्यातून केवळ आकसापोटी केलेल्या असतात, असे अधिकाºयांकडून सांगण्यातून आले.
>तक्रारीच्या गांभीर्यानुसार कारवाई
खोटे तक्रार अर्ज करणाºयांवर गैरवर्तन केल्याप्रकरणी महाराष्टÑ पोलीस (शिक्षा आणि अपिले) नियम १९५६ मधील नियम क्र. ३ (२) नुसार कारवाई केली जाईल. त्यामध्ये त्यांनी केलेल्या तक्रारीचे स्वरूप, त्यांची गंभीरता आणि खात्यावर होणाºया परिणामाचा विचार करून सक्त ताकीद, वेतनवाढ रोखणे किंवा निलंबितसुद्धा केले जाणार असल्याचे मुख्यालयातील अतिवरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.