ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर यांचे निधन
By admin | Published: August 19, 2015 01:37 AM2015-08-19T01:37:18+5:302015-08-19T01:37:18+5:30
प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर विविध प्रकारच्या नाटकांतून खास ठसा उमटविणारे ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर (६९) यांचे मंगळवारी
मुंबई : प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर विविध प्रकारच्या नाटकांतून खास ठसा उमटविणारे ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर (६९) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने ८०च्या दशकात आपल्या लेखणीने हौशी व व्यावसायिक रंगभूमीवर वेगळे प्रयोग करणारा नाटककार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
सामाजिक, कौटुंबिक, रहस्यप्रधान, विनोदी असे वेगवेगळे बाज असणारी नाटके मयेकर यांनी लिहिली; आणि मराठी रंगभूमीवर नाटककार मयेकर यांचे नाव दिमाखात तळपू लागले. मूळच्या प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांची नाट्यसृष्टीत प्र. ल. मयेकर अशीच ओळख होती. व्यावसायिक रंगभूमीवर एन्ट्री घेण्यापूर्वीच त्यांचा नाट्यलेखनाचा प्रवास ते बी.ई.एस.टी.मध्ये नोकरी करत असल्यापासून सुरू झाला होता. त्यांनी विपुल एकांकिका लेखन केले, तसेच हौशी रंगभूमीवर अमूल्य असे योगदान दिले.