मुंबई, दि. 2 - ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कवयित्री शिरीष पै आचार्य अत्रे यांची कन्या होत. कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्म, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व क्षेत्रात त्यांनी लिखाण केलं आहे. त्यांच्या निधनामुळे साहित्य विश्वात हळहळ व्यक्त होते आहे. ''प्रत्येकाबद्दल कौतुकाने बोलणा-या, प्रत्येकाचा आदर करणा-या शिरीष पै गेल्या. गोडवा, बळ देणारा आशीर्वाद हरपला'', अशी भावना ज्येष्ठ साहित्यिका विजया वाड यांनी व्यक्त केली आहे.
विजया वाड असेही म्हणाल्या आहेत की, ''शिरीष पै या आचार्य अत्रेंच्या मोठ्या कन्या, मात्र हा गर्व त्यांच्या वागण्या-बोलण्यात कधीही नव्हता. वडिलांच्या सेवेशी अतिशय लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली. त्यात आचार्य अत्रेंच्या संपूर्ण आठवणी आहेत. हायकू नावाचा जपानी काव्यप्रकार मराठीमध्ये आणण्याचे सर्व श्रेय शिरीष पै यांचं आहे. मनोहर फर्डनकर नावाचे एक हायकूकार होते. त्यांची आर्थिक स्थिती बरी नसताना त्यांचं पुस्तक लिहावं यासाठी प्रयत्न करणार्या शिरीष पै मला अनोख्या वाटतात. कारण एका कवीला दुसऱ्या कवीचा आदर असणं ही दुर्मिळ गोष्ट झाली आहे. कुठल्याही कवींना त्यांनी विन्मुख पाठवलं नाही, नाराज केलं नाही''.
विजया वाड पुढे असेही म्हणाल्या की, शिरीष पै वडिलांचा स्मृतीदिन अतिशय उत्साहात साजरा करायच्या. बेळगाव तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम दादरला सावरकर सभागृहात झाला होता. विजया वाड यांनी शिरीष पै यांच्याबाबतची एक आठवणही यावेळी सांगितली. ''आचार्य अत्रेंची आठवण सांगायला मला बोलावलं तेव्हा मलाही बक्षीस दिलं होतं. त्यावेळी मी त्यांना म्हणाले, मला कशाला? तेव्हा शिरीष पै म्हणाल्या, कोणत्याही कवीला मी विन्मुख पाठवत नाही. प्रत्येकाबद्दल कौतुकाने बोलायच्या, प्रत्येकाचा आदर करायच्या. तो गोडवा होता, जो आज निघून गेला. तो बळ देणारा आशीर्वाद, तो मायेचे हात निघून गेला. काव्यातील शिरीष हरपला'', अशा भावना विजया वाड, यांनी व्यक्त केल्या आहेत.