वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची ईडीने घेतली झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 08:20 AM2021-12-18T08:20:37+5:302021-12-18T08:20:56+5:30
राहुल श्रीरामे यांच्या पाठोपाठ जी. श्रीधर यांचीही चौकशी
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आयपीएस बदली रॅकेटप्रकरणी ईडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची झाडाझडती सुरू केली आहे. पुणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या चौकशीपाठोपाठ शुक्रवारी अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची चौकशी केली.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्राथमिक तपास करून गुन्हा दाखल केला. देशमुख हे गृहमंत्री असताना करण्यात आलेल्या बदल्यांबाबत ७ डिसेंबरला राज्याचे माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे यांची सहा तास चौकशी करीत त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यापाठोपाठ ५ पोलीस उपायुक्तांना समन्स बजाविण्यात आल्याची माहिती आहे. जी. श्रीधर दुपारच्या सुमारास ईडी कार्यालयात हजर झाले. चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डिझायर पोस्टिंग घेऊन पुण्यात आले होते श्रीरामे
- पुण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांची ११ ऑक्टोबर २०२० रोजी पुण्यात नियुक्ती झाली. पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकार पोलीस आयुक्तांना असतात. मात्र, श्रीरामे यांच्याकडे थेट वाहतूक विभागाची सूत्रे दिल्याने पोलीस वर्तुळात चर्चा होती.
- पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला. श्रीरामे यांच्याशी संपर्क साधला असता ईडीने चौकशीसाठी बोलावले होते, असे सांगितले. गुरुवारी पुणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांना समन्स बजावत चौकशीला बोलावण्यात आले होते.
- त्यानुसार ते दुपारी एकच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात पोहोचले. सात तास चौकशी करीत त्यांचा जबाब नोंदविण्यात आला. श्रीरामे मूळचे बारामती तालुक्यातील असून, सातारा सैनिक शाळेत त्यांचे शिक्षण झाले. औरंगाबादमध्ये त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हाही दाखल झाला.