मुंबई : ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे शुक्रवारी रात्री १०च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ६९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विकास सबनीस शुक्रवारी रात्री हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेले होते. तिथेच त्यांची प्रकृती ढासळली आणि हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. विकास सबनीस यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी १० वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अत्यंत मार्दवी स्वभाव आणि सतत हसतमुख राहून सर्वांना मदत करण्याची वृत्ती यामुळे सबनीस सुपरिचित होते. अखंड कार्यरत व्यक्ती म्हणूनही त्यांचा सदैव उल्लेख केला जात असे. सबनीस यांच्या कारकिर्दीला यंदाच्याच वर्षी ५० वर्षे पूर्ण झाली होती. त्यानिमित्त व्यंगचित्र क्षेत्रातील वेगवेगळ्या व्यक्तींनी त्यांच्या कारकिर्दीवर दृष्टिक्षेप टाकताना त्यांच्या शैलीचे कौतुक केले होते. व्यंगचित्रकार या नात्याने त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज ठाकरे यांनी केवळ व्यंगचित्रकलेवर आपले मोठेपण टिकवणारी व्यक्ती, अशा शब्दांत सबनीस यांचा गौरव केला होता. सबनीस यांचे व्यंगचित्र बघून लहानाचा मोठा झालो. त्यांच्याशी चांगली मैत्री झाली होती. त्यांनी प्रत्येक चांगल्या गोष्टीचे, चित्राचे कौतुक केले होते, अशी प्रतिक्रिया व्यंगचित्रकार चारुहास पंडित यांनी दिली.