ज्येष्ठ नेपथ्यकार अशोक पालेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 04:04 AM2021-05-02T04:04:26+5:302021-05-02T04:04:26+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मराठी रंगभूमीवर विविध नाटकांच्या नेपथ्य निर्माणातून स्वतःचा खास ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेपथ्यकार अशोक पालेकर ...

Senior set designer Ashok Palekar passes away | ज्येष्ठ नेपथ्यकार अशोक पालेकर यांचे निधन

ज्येष्ठ नेपथ्यकार अशोक पालेकर यांचे निधन

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मराठी रंगभूमीवर विविध नाटकांच्या नेपथ्य निर्माणातून स्वतःचा खास ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेपथ्यकार अशोक पालेकर यांचे शनिवारी डोंबिवली येथे कोरोना संसर्गाने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.

गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ ते रंगभूमीवर सक्रिय होते. केवळ व्यावसायिक नाटकेच नव्हे; तर महाविद्यालयीन एकांकिका, विविध संस्थांचे कार्यक्रम, वाद्यवृंद यासाठीही नेपथ्य उभे करण्यात त्यांचा हातखंडा होता. उदयोन्मुख युवा कलावंतांसाठी तर ते हक्काचे व्यक्तिमत्त्व होते. असंख्य महाविद्यालयीन रंगकर्मींना त्यांचा मोठा आधार वाटायचा. मध्यंतरीच्या काळात ते कर्करोगाच्या व्याधीने त्रस्त होते; मात्र त्यांनी त्यावर यशस्वीरीत्या मात केली होती. अशोक पालेकर यांच्या निधनाने, रंगभूमीवर वेगळे प्रयोग करू पाहणारा आणि कुणाच्याही साहाय्यास तत्पर असणारा संवेदनशील नेपथ्यकार हरपल्याची भावना नाट्यसृष्टीतून व्यक्त होत आहे.

* नेहमीच मदतीला धावून येत - निनाद शेट्ये

दामोदर हॉलला नाटक ठरल्यावर, शिवडीच्या प्रबोधनकार ठाकरे रंगमंचावर जाऊन अशोक पालेकरांना फक्त काय हवे, नको ते सांगितले की आम्ही प्रयोग करायला मोकळे असायचो. माझ्या ‘चाळ नावाची खट्याळ वस्ती’ या नाटकाचे नेपथ्य त्यांनी केले होते. पाचशेहून अधिक प्रयोग झालेल्या या नाटकाचे निर्माते अनेकदा बदलले; मात्र नेपथ्यकार म्हणून अशोक पालेकर कायम राहिले. केव्हाही मदतीला धावून येणाऱ्या पालेकरांचा आम्हाला मोठा आधार होता, अशा भावना रंगकर्मी निनाद शेट्ये यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना व्यक्त केल्या.

------------------------------

Web Title: Senior set designer Ashok Palekar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.