मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं अधिवेशन गोरेगावच्या नेस्को मैदानात होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे ती म्हणजे राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार आहेत. मनसे हिंदुत्वाच्या दिशेने जाणार असल्याचे संकेत महाअधिवेशनाच्या जाहिरातीवरुन दिसत आहेत. विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा या आशयाचे पोस्टर्स झळकले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करणार असून मनसेचा जुना झेंडा बदलून त्याजागी नवीन भगव्या रंगाचा झेंडा आणणार आहे. या भगव्या झेंड्यात शिवरायांची राजमुद्रा वापरण्याची शक्यता आहे. मात्र राजमुद्रा वापरण्यावर संभाजी ब्रिगेड आणि काही शिवप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. राज ठाकरेंनी शिवसेनेचा राजीनामा देऊन मनसेची स्थापना केली त्यावेळी त्यांनी निळा, भगवा आणि हिरवा अशा रंगाचा झेंडा आणला होता. मात्र मनसेच्या बदलेल्या धोरणामुळे शिवसेनेच्या ज्येष्ठ शिवसैनिकानेही मनसेला आशीर्वाद दिला आहे.
मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर मनसे नेत्या रुपाली पाटील यांना एका ज्येष्ठ शिवसैनिकांनी कॉल करुन तुम्ही मांडलेली भूमिका योग्य आहे त्यासाठी तुमचं कौतुक असल्याचं सांगितलं. याबाबत मनसेने ऑडिओ रेकॉर्डींग ट्विट करत म्हटलंय की, खरं तर दोन व्यक्तिंमधील खाजगी संभाषण हे जाहीर करू नये हा संकेत असतो पण त्या संभाषणाला जर आशीर्वादाची, सदिच्छांची किनार असेल तर कधी संकेतभंग करायला देखील हरकत नाही. हे ज्येष्ठ शिवसैनिक अनामिक आहेत, पण आम्हाला ते वंदनीय आहेत असं सांगण्यात आलं आहे.
आज मनसेचं महाअधिवेशन; राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष
यामध्ये संवादामध्ये ज्येष्ठ शिवसैनिक माधव लेले म्हणतात की, मी ६७ मधील बाळासाहेबांचा सैनिक आहे. पूर्वी आम्ही मोरारजींची गाडी अडवायला जायचो पण आता अंगात शक्ती राहिलेली नाही. आत्ताचे लोक विचारांशी ठाम नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी ठाम होते. रस्त्यावर उतरुन संघर्ष करणं जमलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.
छत्रपती जसे तुमचे आदर्श तसे आमचेही; झेंड्यावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना मनसेची चपराक
मनसे महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पक्षाच्या नवीन झेंड्याचे अनावरण करणार आहेत. त्यानंतर विविध विषयांवर या अधिवेशनात ठराव मांडले जातील. संध्याकाळी ६ च्या सुमारास राज ठाकरेंचे भाषण होणार आहे. महाअधिवेशनासाठी राज्यभरातून मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत.