महाराष्ट्राला चांगली जोडी मिळालीय; अण्णा हजारेंचा एकनाथ शिंदेंना फोन, सरकारच्या कामाचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 02:37 PM2023-02-09T14:37:15+5:302023-02-09T14:49:31+5:30
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे.
मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज ५९ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. राज्यातील इतर राजकीय नेते देखील एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. तसेच सर्व स्थरांतून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा येत आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही मुख्यमंत्री शिंदेंना फोनवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.यावेळी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाचे कौतुकही केले आहे.
'तुमच्या कामाच्या बातम्या वाचतो, चांगले काम करत आहात. असंच काम पुढ सुरू ठेवा. आमचा आशिर्वाद चांगल काम करणाऱ्या लोकांच्या पाठिमागे कायम आहे, असं कौतुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अण्णा हजारे यांनी केले.
'तळागाळातून परिवर्तन होणे गरजेचे होते. तुमची जोडी चांगली काम करते. ही जोडी महाराष्ट्राला चांगली मिळाली आहे. तुमचा महाराष्ट्रासाठी एक-एक क्षण महत्वाचा आहे. तो क्षण तुम्ही राज्याच्या समाजकारणासाठी लावा, असंही अण्णा हजारे म्हणाले.
संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकरांनी त्यांना आज एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असल्याचं सांगितलं. यावर माझे सहकारी म्हणून तसेच एक व्यक्ती म्हणून वाढदिवसाला त्यांना आम्ही शुभेच्छा देतच असतो. आम्ही राजकीय शत्रू आहोत आणि शत्रू कायम राहणार, मात्र खाद्या व्यक्तीचा वाढदिवस आहे, तर त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजे, असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या.
एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाचा वाढदिवस आहे. शिंदेंना शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी ठाण्यात त्यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यात रात्री कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ठाण्यात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बँनर लागले आहेत. काही ठिकाणी बॅनरवर भेटला विठ्ठल असे लिहले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"