मुंबई : रेल्वे सुरक्षा बलाचे जवान कुठे पहारा देत आहेत, कोणत्या लोकलमधून कर्तव्य निभावत आहेत. याची माहिती जवानांच्या वरिष्ठांना अॅपद्वारे मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक जवानावर वरिष्ठांची करडी नजर ठेवली जाणार आहे. प्राथमिक स्वरूपात या अॅपचे नाव ई-पेट्रोलिंग ठेवण्यात येणार आहे.मध्य आणि पश्चिम रेल्वेतील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांसाठी ई-पेट्रोलिंग अॅप तयार केले आहे. याचे प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत ई-पेट्रोलिंग अॅप प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त अश्रफ के. के. यांनी दिली.रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांची सेक्शन आणि बीटद्वारे विभागणी करण्यात येणार आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने मोबाइल अॅप डाउनलोड करायचे आहे. त्यानुसार कर्तव्यावर आल्यावर हे अॅप सुरू करायचे. त्यानंतर जवान कोणत्या ठिकाणी किंवा लोकलमध्ये गस्तीवर आहे. याची माहिती कंट्रोल रूमद्वारे कळणार आहे. तसेच रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांसाठी लोकलच्या डब्यामध्ये क्युआर कोड लावण्यात येणार आहे. याद्वारे स्कॅन करावा लागणार आहे.
रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांवर अॅपच्या माध्यमातून वरिष्ठांचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 6:01 AM