पोलिसांसाठी विशेष मोहीम सुरु...
पोलिसांसाठी विशेष मोहीम सुरु
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाकाळात १०० हून अधिक पोलिसांना गमावल्यानंतर पोलिसांनी पोलीस तंदुरुस्त राहावेत, त्यांना प्रकृतीच्या काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती मिळावी यासाठी मुंबई पोलिस दलामध्ये ‘फिटनेस’ मोहीम हाती घेतली. यादरम्यान त्यांच्या फिटनेसवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक जण फिट राहण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र पहावयास मिळते आहे.
कोरोना काळात मुंबई पोलीस ऑन ड्यूटी २४ तास जीव धोक्यात घालून कार्यरत आहेत. गेल्या वर्षी पोलीस दलातील ९९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या लाटेतही मृत्यूसत्र सुरुच होते. अशात, मृत्यू झालेल्या पोलिसांपैकी ९० टक्के पोलिसांना सहव्याधी होत्या. कामाचा ताण, अवेळी जेवण आणि प्रकृतीकडे दुर्लक्ष होत असल्याने पोलिसांमधील आजार बळावत असल्याचे समोर येताच मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलिसांच्या आरोग्यासाठी एक मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला. जुलै महिन्यापासून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यामध्ये त्यांनी क़ाय खावे क़ाय खाऊ नये यासह त्यांच्या फिटनेसवर भर देण्यात आला. पोलीसही स्वतः काळजी घेताना दिसत आहेत.
....
फिटनेस जरूरी है... म्हणत कमी केले २५ किलो वजन
फिटनेस जरूरी है... म्हणत मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपाई शशिकांत गंगावणे यांनी अवघ्या काही महिन्यात तब्बल २५ किलो वजन कमी केले आहे. नियमित योग, योग्य आहार, झोप घेत त्यांनी ही किमया साधली आहे. कोरोनाच्या काळातही कर्तव्याबरोबर स्वतःची काळजी घेत, त्यांची फिटनेससाठी धडपड सुरू आहे.