सेनेने अंगण राखले!

By admin | Published: April 16, 2015 02:35 AM2015-04-16T02:35:56+5:302015-04-16T02:35:56+5:30

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या वांद्रे (पूर्व) आणि तासगाव या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपापले गड शाबूत राखले.

Senna maintains the courtyard! | सेनेने अंगण राखले!

सेनेने अंगण राखले!

Next

वांद्र्यातही राणे चीत : ‘एमआयएम’चे डिपॉझिट जप्त, राष्ट्रवादीने तासगाव राखले
जमीर काझी - मुंबई/सांगली
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या वांद्रे (पूर्व) आणि तासगाव या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपापले गड शाबूत राखले. किंबहुना मागील निवडणुकीच्या तुलनेत वाढीव मते घेऊन ते अधिक मजबूत केले. वांद्रेत शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा १९ हजारांनी पराभव केला, तर सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमनताई पाटील तब्बल १ लाख १२ हजार ९६३ इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या. वांद्रेत एमआयएमची तर तासगावमध्ये भाजपा बंडखोरासह इतर सर्व उमेदवारांची अनामत जप्त झाली.
शिवसेनेचे आमदार बाळा सावंत आणि राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे अनुक्रमे वांद्रे आणि तासगावमध्ये पोटनिवडणूक झाली. शिवसेनेने बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देऊन ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला; परंतु माजी मुख्यमंत्री नारायण राणे (कॉंग्रेस) आणि रहेबर खान (एमआयएम) मैदानात उतरल्यामुळे वांद्रे (पूर्व) मतदारसंघात अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. एमआयएमच्या ओवेसी बंधुंनी केलेला विखारी प्रचार आणि राणेंसारखा तगडा प्रतिस्पर्धी समोर असल्याने ‘मातोश्री’च्या अंगणातील ही निवडणूक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. शिवाय, मतांचा टक्का घटून केवळ ३८.८६ टक्के मतदान झाल्यामुळे येथील लढतीचा कौल नेमका कोणाच्या पारड्यात पडणार, याबाबत कमालीची उत्सुकता लागून होती.
प्रचंड पोलिस बंदोबस्तात वांद्रे (पू) ची मतमोजणी झाली. पहिल्या फेरीपासून सेनेच्या तृप्ती सावंत यांनी घेतलेली आघाडी शेवटच्या १९ व्या फेरीपर्यंत कायम राहिली. सुरुवातीला मराठी भाषक पट्ट्यातील मोजणी सुरु असल्याने कॉँग्रेस कार्यकर्ते थांबून होते. मात्र, गोळीबार मैदान, बेहरामपाडा या ठिकाणाहूनही शिवसेनेच्या उमेदवाराला आघाडी मिळत गेली आणि कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी तेथून काढता
पाय घेतला. राणे यांचे पूत्र
आमदार नितेश राणे हे ही सातव्या फेरीनंतर तेथून निघून गेले. साडेअकराच्या सुमारास सर्व १९ फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली. त्यात सावंत यांनी १९ हजार ८ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला़ पहिल्या फेरीपासूनच शिवसैनिकांनी जल्लोष केला.

उमेदवारांना मिळालेली मते
सुमनताई पाटील : १,३१,२३६
स्वप्नील पाटील : १८,२७३
प्रशांत गंगावणे : १,०६२
अलंकृता आवाडे-बिचुकले : ४४४
सुभाष अष्टेकर : ६०८
आनंदराव पवार : ६१०
धनंजय देसाई : ३६९
विजय पाटील : १९३
सतीश सनदी : ६५७
नोटा : १,४९५

तासगावमध्ये विक्रमी मताधिक्य
१तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात सुरुवातीपासूनच भावनिक वातावरण होते. राष्ट्रवादीने आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनतार्इंना उमेदवारी दिली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी राष्ट्रवादी नेत्यांची अपेक्षा होती. त्यांच्या आवाहनानुसार सर्वच प्रमुख पक्षांनी निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतली होती, मात्र भाजपमधून स्वप्नील पाटील यांनी बंडखोरी केली. ते माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे समर्थक असल्याने ही बंडखोरी चर्चेत होती.
२एकूण ५८.७४ टक्के मतदान झाल्याने निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. बुधवारी तासगाव येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत मतमोजणी झाली. पहिल्या फेरीपासूनच सुमनतार्इंनी मोठी आघाडी घेतली होती. ती अखेरपर्यंत कायम राहिली. मतमोजणीच्या २२ फेऱ्या झाल्या. त्यात मतदानयंत्रातील मोजणीच्या २१, तर टपाली मतदानाच्या एका फेरीचा समावेश होता. सुमनतार्इंना १ लाख ३१ हजार २३६ मते, तर स्वप्नील पाटील यांना केवळ १८ हजार २७३ मते मिळाली.
३तासगाव तालुक्यातील चिंचणी हे भाजपचे खासदार संजय पाटील यांचे मूळ गाव असल्याने तेथील मताधिक्याबाबत उत्सुकता होती. या गावातूनही सुमनतार्इंना १ हजार २२७ मताधिक्य मिळाले. आर. आर. पाटील यांच्या अंजनी गावातून तब्बल २0३५ चे मताधिक्य मिळाले. विरोधी उमेदवाराला अंजनीतून केवळ ३0 मते मिळाली. स्वप्नील पाटील यांना सावर्डे या स्वत:च्या गावातूनही मताधिक्य मिळू शकले नाही.
४विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या. गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीला फाटा देत हा विजय आर. आर. पाटील यांना समर्पित करण्यात आला.

पतीचे अपूर्ण
कार्य पूर्ण करणार
मतदारांची मी अत्यंत आभारी आहे. पती बाळा सावंत यांचे अपूर्ण कार्य शिवसैनिकांच्या मदतीने पूर्ण करीन. - तृप्ती बाळा सावंत, शिवसेना

सहा महिन्यांत राणे दोनदा पराभूत
च्नारायण राणे यांना अवघ्या सहा महिन्यांत पराभवाचे दोन झटके बसले. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात आॅक्टोबर महिन्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राणे यांचा १० हजार मतांनी पराभव झाला. आता वांद्रे (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीत १९ हजार मतांनी राणे पराभूत झाले. दोन्ही ठिकाणी शिवसेनेनेच त्यांना धूळ चारली. कुडाळमध्ये वैभव नाईक यांनी, तर वांद्रे येथे तृप्ती बाळा सावंत यांनी राणेंना जबर धक्का दिला.
च्या पराभवाचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर होणार आहे.

विकासाऐवजी भावनेला मत
निवडणुकीत हार-जीत ही होतच असते. गेल्या ४५ वर्षांत नऊ निवडणुका लढलो. त्यामुळे पराभवाची जी चर्चा होत आहे ती आपल्याला नवी नाही. मतदारांनी विकास आणि नागरी सुविधांऐवजी भावनेला मत दिले. जनतेला विकास नको असल्यास माझी काही हरकत नाही.
- नारायण राणे

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात भावनिक वातावरणात झालेल्या निवडणुकीत आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या. भाजपाचे बंडखोर उमेदवार स्वप्नील पाटील यांचा सुमनताई यांनी तब्बल १ लाख १२ हजार ९६३ मतांनी पराभव केला. इतर सर्व उमेदवारांची अनामत जप्त झाली.

वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील विजय हा शिवसैनिकांच्या निष्ठेचा आणि शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या मतदारांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. -उद्धव ठाकरे

 

Web Title: Senna maintains the courtyard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.