Join us

कलिना परिसरातील घटलेल्या मताधिक्यामागे सेनेची नाराजी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 1:03 AM

काँग्रेसच्या आशा पल्लवीत : शिवसेना व भाजपमध्ये विधानसभेसाठी चुरस वाढणार

खलील गिरकरविधानसभा । कलिना

मुंबई : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील कलिना विधानसभा मतदारसंघात भाजपच्या खासदार पूनम महाजन यांना ६५ हजार ४०० मते मिळाली, तर काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांना ५५ हजार ९१७ मते मिळाली आहेत. या मतदारसंघात महाजन यांना केवळ ९,४८३ मताधिक्य मिळाले आहे. २०१४च्या निवडणुकीत या मतदारसंघात महाजन यांना सुमारे २० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले होते. शिवसेनेचे विभागप्रमुख संजय पोतनीस या मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे या मतदारसंघातील घटलेल्या मताधिक्याची चर्चा होत आहे. शिवसेनेची नाराजी भोवल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कलिना मतदारसंघात पूनम महाजन यांना ६६ हजार २५७ मते मिळाली होती, तर प्रिया दत्त यांना ४५ हजार ८५६ मते मिळाली होती. त्यावेळी महाजन यांना २० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले होते. यावेळी महाजन यांचे मताधिक्य सुमारे १० हजार ५०० ने कमी झाले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत महाजन यांच्या मतांमध्येदेखील घट झाली आहे, तर दत्त यांच्या मतांमध्ये सुमारे १० हजारांची वाढ झाली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेचे संजय पोतनीस विजयी झाले होते, त्यांना ३० हजार ७१५ मते मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपच्या अमरजीत सिंग यांना २९ हजार ४१८ मते मिळाली होती. अवघ्या १,२९७ मताधिक्याने पोतनीस यांचा विजय झाला होता. दोन्ही पक्षांना एकूण ६०,१३३ मते मिळाली होती, तर काँग्रेसच्या कृपाशंकर सिंह यांना २३ हजार ५९५ मते व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कप्तान मलिक यांना १८ हजार १४४ मते मिळाली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळून ४१ हजार ७३९ मते मिळाली होती.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाजन यांना प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात युवासेनेच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. महाजन यांच्या मातोश्री भेटीनंतर ही नाराजी दूर झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, महाजन यांचे शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात बºयापैकी घटलेल्या मताधिक्यामुळे शिवसेनेकडून पूर्ण ताकदीने महाजन यांना मतदान झाले की नाही, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

 

टॅग्स :विधानसभा निवडणूक 2019