लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पारदर्शकतेच्या पहारेकऱ्यांनी नाल्यात उतरून नालेसफाईचे बिंग फोडण्यास सुरुवात केली आहे. शहर व उपनगरांतील नाल्यांचा दुसरा पाहणी दौरा करून नालेसफाईच्या कामांबाबत शंभर टक्के असमाधानी असल्याचे जाहीर करीत, भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधला. एवढेच नव्हे, तर मंगळवारी शिवसेनेने केलेला पाहणी दौरा हा भ्रष्ट ठेकेदारांना क्लीन चिट देण्यासाठीच होता, असा आरोप करीत भाजपाने खळबळ उडवून दिली आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईतील नाल्यांच्या सफाईची पाहणी केली. नालेसफाई कधीच शंभर टक्के होत नसते व नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार नाहीच, असा दावा त्यांनी या दौऱ्या वेळी केला. भाजपाने हीच संधी साधत पश्चिम उपनगरातील नालेसफाईची चिरफाड केली. नाल्यातील गाळ नेमका किती काढला जातो? कुठे टाकला जातो? असा सवाल करीत भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी ठेकेदारांकडे असलेल्या बोगस पावत्या उघड केल्याचा दावा केला आहे.आतापर्यंत नालेसफाईचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी संगणमत करून काम न करण्याचे ठरवले. त्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली होती. मात्र, बऱ्याच प्रयत्नांनंतर सध्या नालेसफाईची जी कामे सुरू आहेत ती पाहिल्यावर शंभर टक्के समाधान व्यक्त करावे, अशी परिस्थिती निश्चितच नाही. ज्या नाल्यातून गाळ काढला जातो आहे. तो गाळ मीरा-भार्इंदर येथील वजनकाट्यावर वजन करून वर्सोवा येथील खासगी कचराभूमीवर टाकला जातो आहे. त्यामुळे आजही बोगस पावत्या सापडल्या. त्यामुळे कालचा पाहणी दौरा या ठेकेदारांना क्लीनचिट देण्यासाठीच होता, असा हल्ला शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चढविला आहे.
ठेकेदारांना क्लीन चिट देण्यासाठी सेनेचा दौरा
By admin | Published: May 11, 2017 2:29 AM