सेनेने गड राखला
By admin | Published: April 16, 2015 02:23 AM2015-04-16T02:23:57+5:302015-04-16T02:23:57+5:30
हारलेला डाव रागाने पुन्हा मांडू नये खेळण्यांनी खेळण्यांशी हे असे भांडू नये सोसताना ही कशी तृप्तीत सोसावी व्यथा आसवांची बात न्यारी, पण स्वत: सांडू नये
हारलेला डाव रागाने पुन्हा मांडू नये खेळण्यांनी खेळण्यांशी हे असे भांडू नये सोसताना ही कशी तृप्तीत सोसावी व्यथा
आसवांची बात न्यारी, पण स्वत: सांडू नये - सुरेश भट
(वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत पराभव पत्करावे लागलेले नारायण राणे यांना सुरेश भट यांची ही रुबाया चपखल लागू पडते नाही का?)
नारायण राणे लढवय्ये नेते
निवडणुकीत हार-जीत होत राहते. राणे लढवय्ये नेते आहेत. त्यांनी चांगली लढत दिली. काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढली. मुंबईमध्ये राणेंव्यतिरिक्त अन्य नेता टिकला नसता. एक सक्षम आणि ज्येष्ठ नेते म्हणून पक्षाने त्यांच्या नावाचा विचार केला. त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक लढवली, आक्रमक प्रचार केला ते वाखाणण्याजोगे आहे.
- खा. अशोक चव्हाण, काँग्रेस, प्रदेशाध्यक्ष
राणेंनी
चूक केली
नारायण राणेंचा
पराभव हा अपेक्षितच होता. मुळात वांद्रे पूर्वेत निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्णयच चुकीचा होता. राणे राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री होते. अशावेळी आपली जन्मभूमी, कर्मभूमी कोकणात पराभव झाल्यानंतर सहा महिन्यांत पुन्हा मुंबईत पोटनिवडणूक लढवायला नको होती. आता राणेंनी खरेतर निवृत्तीच घ्यायला हवी. - गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री
शिंगावर घ्यायला घाबरत नाही -उद्धव ठाकरे
विजय हा विजय असतो. मी कुणाचा पराभव केला याला महत्व नाही. याबाबत आपण नेहमी सकारात्मक विचार करतो. शिवसैनिक स्वत:हून कुणाच्या अंगावर जात नाही. मात्र एखादा अंगावर आला तर त्याला शिंगावर घ्यायला घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
पोटनिवडणुकीत शिवसेनेला आशीर्वाद देणारे मन आणि हात लक्षात ठेवा. ते विसरलात तर काय होते हे आजच्या निवडणुकीने काहींना निश्चित कळले असेल, असा टोला ठाकरे यांनी नारायण राणे यांचा नामोल्लेख टाळून केला.
बेहरामपाडा, भारतनगर या मुस्लीमबहुल विभागातही शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान झाले असल्याकडे लक्ष वेधत ठाकरे म्हणाले की, ज्यांनी मुसलमानांना भडकावण्याचे राजकारण केले त्यांना मुसलमानांनीच उत्तर दिले आहे.
सुरुवातीपासून वांद्रे निवडणूक तिरंगी
वांद्रे (पू़) पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपा, रिपाइंचा तर कॉँग्रेसला राष्ट्रवादी, समाजवादी, शेकापने पाठिंबा दिला. तर एमआयएमने आपला उमेदवार या पोटनिवडणुकीत उमेदवार उतरविला, त्यामुळे विधानसभेप्रमाणे ही निवडणूक पंचरंगी न होता ति२ंगी झाली.
राणेंना केवळ सहा फेऱ्यांमध्ये जादा मते
मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत सेनेच्या तृप्ती सावंत यांचे मताधिक्य सातत्याने वाढत राहिले होते. त्यांत अपवाद राहिला तो केवळ ६ फेऱ्यांचा. ३,११, १३, १४, १८ व १९ या फेऱ्यांमध्ये नारायण राणे यांना सावंत यांच्यापेक्षा जादा मते मिळाली.
विजयाची घोडदौड सुरूच
वांद्रे पोटनिवडणुकीतील तृप्ती सावंत यांचा दणदणीत विजय म्हणजे जनतेने भाजपा-शिवसेना युतीला दिलेला कौल आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीतही युतीच्या विजयाची घोडदौड कायम राहील.
- खा. रावसाहेब पाटील-दानवे
भाजपा प्रदेश अध्यक्ष
राणेंनी लढायला नको होते
वांद्रे पोटनिवडणुकीत महायुतीचा विजय पक्का होता. त्यामुळे नारायण राणे यांनी ही निवडणूक लढवायलाच नको होती. काँग्रेसला या निवडणुकीत धक्का द्यायचा ही घराघरात भावना होती. - खा़रामदास आठवले, अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया.
निकालाने धक्का बसला
आम्ही विजयासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो होतो, पण निकालांनी मोठा धक्का बसला. शेवटच्या दोन-चार दिवसांत मतदारसंघात बाहेरच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर अपप्रचार केला. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
- रेहबर खान, एमआयएम
राणेंनी रडीचा डाव खेळला
राज्यातील निवडक दहा-पंधरा ज्येष्ठ नेत्यांमध्ये नारायण राणेंचा समावेश होतो. राज्याचे ते मुख्यमंत्रीही होते. अशा नेत्याने एखाद्या सहकारी आमदाराच्या मृत्यूनंतर होणारी पोटनिवडणूक लढवायला नको होती. राणेंनी हा रडीचा डाव खेळला आहे. - आ. आशिष शेलार, मुंबई भाजपा अध्यक्ष
सोशल मीडियावर उमटले निकालाचे पडसाद
नारायण राणे यांच्या पराभवाची सोशल मीडियात जोरदार खिल्ली उडवली जात आहे. कुणी त्यांना पाकिस्तानचे तिकीट दिली आहे, तर कुणी नगरसेवकपदाची निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला आहे. कुणी शिवसेनेच्या वाघाची प्रशंसा केली आहे तर कुणी नारायण राणेंवर जोरदार निशाणा साधला. सोशल मीडियावर ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणत अजून दोन तासांनी नारायण राणे यांचे नाव ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’ मध्ये समाविष्ट होणार. विधानसभेच्या दोन निवडणुकांत पराभूत होण्याची किमया साधणारे देशातले पहिले माजी मुख्यमंत्री ठरणार, यानिमित्त राणे यांच्या स्वागताची सिंधुदुर्गात जोरदार तयारी’ हा मेसेजही व्हॉटसअॅपवर व्हायरल झाला..