संशयास्पद वस्तूमुळे खळबळ
By admin | Published: May 11, 2017 02:23 AM2017-05-11T02:23:15+5:302017-05-11T02:23:15+5:30
माहुल गाव येथून घाटकोपर येथे जाणाऱ्या बसमध्ये बुधवारी दुपारी एक संशयास्पद वस्तू आढळून आल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माहुल गाव येथून घाटकोपर येथे जाणाऱ्या बसमध्ये बुधवारी दुपारी एक संशयास्पद वस्तू आढळून आल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. अखेर ही बस चेंबूर पोलीस ठाण्याबाहेर दाखल करत तिची तपासणी केली असता यामध्ये काही लोखंडी वस्तू आढळल्या. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील वाहतूक सुमारे तासभर बंद करण्यात आली होती.
चेंबूरच्या माहुल गाव येथून नेहमी प्रमाणे बसमार्ग क्रमांक ३८१ (बस क्रमांक एम एच ०१,एल ९२२२) ही दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास निघाली. घाटकोपरला जाणाऱ्या या बसमध्ये नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यानुसार बुधवारीदेखील या बसमध्ये प्रवाशांची गर्दी होती. दरम्यान एका प्रवाशाला त्याच्या बाजूच्याच सीटवर पत्र्याचा एक बॉक्स दिसला.
वजनाने जड असल्याने त्याने ही माहिती वाहकाला दिली.
वाहकाने इतर प्रवाशांकडे विचारणा केली. मात्र, कोणाचीच ती वस्तू नव्हती. तोपर्यंत ही बस चेंबूर कॉलनी जवळ आली होती. वाहकाने चालकाला ही माहिती दिल्यानंतर चालकाने बस चेंबूर पोलीस ठाण्यासमोर दाखल केली.
पोलिसांना ही बाब सांगितल्यानंतर पोलिसांनी प्रवाशांना खाली उतरवत चेंबूर नाक्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद केली. त्यानंतर बॉम्बशोधक पथकाला बोलवण्यात आले.
बॉम्बशोधक पथकाने बॉक्स ताब्यात घेत त्याची तपासणी
केली असता ते कुठल्यातरी
मशिनचे पार्ट असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला. मात्र, ते विस्फोटक नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. सुमारे तासभर हा प्रकार चेंबूर पोलीस ठाण्याबाहेर सुरू होता. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.