मंत्रालयात खळबळ! सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञात महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात
By पूनम अपराज | Published: September 6, 2019 12:02 AM2019-09-06T00:02:19+5:302019-09-06T00:18:46+5:30
मंत्रालयातील पोलिसांना अज्ञात महिला आढळून आली. मात्र, दोन दिवस मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे ती मंत्रालयात थांबली होती.
पूनम अपराज
मुंबई - मंत्रालयाच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रात्री 1.30 वाजताच्या सुमारास एक अज्ञात महिला मंत्रालयात झोपलेल्या अवस्थेत आढळून आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागाचे पोलीस तैनात आहेत. याच पोलिसांच्या बंदोबस्तात देखील काही दिवसांपूर्वी माहिती चोरीचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर आता या अज्ञात महिलेमुळे राज्याचे प्रशासकिय मुख्यालय असलेल्या मंत्रालयात खळबळ माजली होती. मात्र, सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष खानविलकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले,
मंत्रालयातील पोलिसांना अज्ञात महिला आढळून आली. मात्र, दोन दिवस मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे ती मंत्रालयात थांबली होती. तिला पोलिसांनी ताब्यात घेऊन मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आणले आणि तिची कसून चौकशी केली. तिच्याजवळील कागदपत्रे तपासून पाहिली. त्यावेळी तिचं नाव सुरेखा शिंदे (४२) असून ती पुण्यातील तळेगाव येथे राहणारी असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या काही कामानिमित्त मंत्रालयात आली होती. तिच्याकडे वैध मंत्रालयीन प्रवेश पासही होता. दुसरा कोणताही हेतू नसल्याचे तपासात दिसून आले असल्याची माहिती खानविलकर यांनी दिली. नंतर अतिवृष्टीमुळे महिलेला महिला पोलिसांसोबत रात्रभर ठेवून सकाळी ती महिला निघून गेली असल्याची पुढे माहिती खानविलकर यांनी दिली. मात्र, मंत्रालयात ती कोणत्या खात्यात आणि काय कामानिमित्त आली होती याबाबत खानविलकर यांच्याकडे उपलब्ध नव्हती.