Join us

खळबळजनक! मुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात आढळली मगर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 7:34 PM

गेले अनेक दिवस या मगरीने येथे मुक्काम ठोकला आहे.

ठळक मुद्देनोव्हेंबर महिन्यात प्रथम काही आजूबाजूच्या इमारतीत रहाणाऱ्या नागरिकांना ही मगर प्रथम दिसली होती.  ही मगर या कन्स्ट्रक्शन साईटवर दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगतच्या रहिवासी भागांमध्ये याआधी बिबट्यांचा वावर पाहायला मिळायचा. परंतु आता चक्क या परिसरात मगरी देखील आढळून आल्यामुळे नागरिक दहशतीखाली आहेत. मुलुंडच्या स्वप्ननगरी परिसरामध्ये असलेल्या एका विकासकाने इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साचल्यामुळे या मगरीला या पाण्यामध्ये आसरा मिळाला असल्याचे प्राणिमित्राचे म्हणणे आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून या मगरीने या परिसरामध्ये ठिय्या मांडला होता. मुलुंड पश्चिम येथील स्वप्ननगरी परिसरात एका निर्माणाधिन इमारतीच्या खड्डयात साचलेल्या पाण्यात एक साडे तीन फूट लांब मगर आढळून आली आहे. गेले अनेक दिवस या मगरीने येथे मुक्काम ठोकला आहे. नोव्हेंबर महिन्यात प्रथम काही आजूबाजूच्या इमारतीत रहाणाऱ्या नागरिकांना ही मगर प्रथम दिसली होती. तसेच अधूनमधून ही मगर दिसत होती. याबाबत स्थानिकांनी वनविभागाला कळविले असले तरी यावर वनविभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. इंडियन मास्क क्रोकोडाईल या जातीची ही मगर आहे. स्वप्ननगरी हा मुलुंड संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागूनच असलेला परिसर आहे. या ठिकाणी या अगोदर देखील अनेक वन्य प्राण्यांचा सर्रास वावर दिसून आला आहे. परंतु ही मगर या कन्स्ट्रक्शन साईटवर दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :मुंबईवनविभाग